(रत्नागिरी / वार्ताहर)
जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अखर्चित भागीदार संस्था म्हणून चक्रभेदी सोशल फाउंडेशन, रत्नागिरी या संस्थेची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मनरेगा बिनखर्चिक भागीदार संस्था म्हणून निवड होणारी ही पहिली आणि एकमेव संस्था ठरली असून, संस्थेवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संस्थेच्या वैदेही सावंत यांनी यशदा आणि एनआयआरडी यांच्या माध्यमातून स्टेट मास्टर ट्रेनर म्हणून क्लास वन अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी वित्त आयोग आराखडा, पंचायत राज व्यवस्था, सरपंचांचे अधिकार व कर्तव्ये यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे. तळागाळातील लोकांसोबत काम करण्याचा संस्थेला मोठा अनुभव असून, विशेषतः विधवा व एकल महिला तसेच पर्यावरण संवर्धन या विषयांवर संस्था सातत्याने कार्यरत आहे.
चक्रभेदी सोशल फाउंडेशनतर्फे शिवीमुक्त समाज अभियान, स्थलांतर रोखणे, रोजगार निर्मिती, विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, जीवन कौशल्य कार्यशाळा, शेअरिंग अँड केअरिंग उपक्रम, कापडी पिशवी वाटप आदी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम स्वबळावर राबविण्यात येत आहेत. कोणताही आर्थिक निधी उपलब्ध नसतानाही समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी संस्था अविरतपणे कार्य करत असून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे.
संस्थेच्या या कार्याची दखल घेत मनरेगा अंतर्गत अखर्चित भागीदार संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून मृदा व जलसंधारण, वृक्ष संगोपन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, अभिसरण, मूलभूत सुविधांचा विकास तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविता येणार आहेत. विशेषतः गावपातळीवर रोजगारनिर्मिती करून स्थलांतर थांबविण्यास मदत होणार असून, विधवा महिला, इतर महिला, बेरोजगार तरुण आणि शेतकरी यांनाही याचा मोठा लाभ मिळणार आहे.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या समवेत संस्थेच्या वैदेही सावंत यांची बैठक पार पडली. यावेळी मनरेगा विभागाचे साळुंखे सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, कृषी अधिकारी प्रदीप फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सागर पाटील तसेच गटविकास अधिकारी उमेश गावखडकर यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी संस्थेच्या स्पंदा राणा, बिस्मिल्ला नदाफ आणि समीक्षा मांजरेकर उपस्थित होत्या.

