(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील मिऱ्या-नागपूर महामार्गावरील साखरपा तिठ्याजवळील सर्व्हिस रोडवर रात्रीच्या वेळी एसटी बसेस जेवणासाठी थांबत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होत आहे. बसमधील काही प्रवासी प्लास्टिक पिशव्या, अन्नाचे उरलेले पदार्थ तसेच इतर कचरा रस्त्याच्या कडेला व परिसरात फेकून देत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाल्याने पावसाच्या पाण्यासोबत हा कचरा इतरत्र पसरत असून संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण, बस चालक, वाहक की एसटी प्रशासन? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
परिवहन विभागाच्या नियमांनुसार परवानगीशिवाय एसटी बसेसना खाजगी धाब्यांवर थांबविण्यास मनाई असतानाही साखरपा तिठ्यावर रात्रीच्या वेळी बसेस थांबत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या मार्गावर वाहनांची संख्या आणि वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून, अशा ठिकाणी बस थांबल्याने अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचीही चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरोना काळापासून साखरपा बसस्थानकावरील उपहारगृह बंद असल्याने चालक-वाहक आणि प्रवाशांना जेवणासाठी खाजगी धाब्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, जेवणानंतर परिसरात कचरा टाकला जात असल्याने सर्व्हिस रोड आणि आसपासचा भाग अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे या घाणीला जबाबदार कोण, एसटी महामंडळ की संबंधित धाबा व्यावसायिक? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
साखरपा परिसरातील नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून स्वच्छतेबाबत कठोर उपाययोजना कराव्यात, तसेच या प्रकारावर नियंत्रण आणावे, अशी मागणी केली आहे.

