(पाली / वार्ताहर)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ पाली ही केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर नवोदय, शिष्यवृत्ती अशा स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत सातत्याने स्थान मिळवते आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही जिल्हा पातळीवर विद्यार्थी उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. या शाळेची कामगिरी इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत असून, तिची शैक्षणिक प्रगती ही जिल्ह्यातील इतर शाळांसाठी निश्चितच उत्तम उदाहरण आहे, असे गौरवोद्गार डाएट रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. सुशील शिवलकर यांनी काढले.
आज पाली येथे जि.प. आदर्श विद्यामंदिर पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये पार पडलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर अधिव्याख्याता राहुल बर्वे, दीपा सावंत, जिल्हा समन्वयक निकुंबे सर, पाली सरपंच विठ्ठल सावंत, अॅड. सागर पाखरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे, उपाध्यक्ष प्रार्थना ठीक आणि पूर्वा पावसकर उपस्थित होते.
प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत करत शैक्षणिक पालखी दिंडी काढण्यात आली. नवागत विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश करताना पहिल्या पावलाचा ठसा उमटवण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक जनार्दन मोहिते व शिक्षक ममता सावंत, मारुती घोरपडे, श्रद्धा रसाळ, नेहा जाधव आणि श्रुती वारंग यांनी विशेष परिश्रम घेतले.