(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील कुर्धे येथे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामादरम्यान संरचनेचा एक भाग कोसळून सुपरवायझर अक्षय काटे यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, ज्या पुलाच्या कामात हा अपघात झाला त्या कामाला अद्याप प्रशासकीय मंजुरी व निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याची माहिती पुढे येत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
कुर्धे येथील लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यान असलेल्या छोट्या नदीवरील साकव जीर्ण झाल्याने ग्रामस्थांनी वाहतुकीसाठी सक्षम पुलाची मागणी केली होती. त्यानुसार साकव विकास कार्यक्रमांतर्गत सुमारे ५५ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, या कामासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे अधिकृत मंजुरीपूर्वीच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात कशी झाली, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मंगळवारी पुलावरील काँक्रीटचा भाग अचानक कोसळल्याने सुपरवायझर अक्षय काटे यांचा जागीच मृत्यू झाला. एका तरुणाचा जीव घेणाऱ्या या दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असले, तरी काम सुरू असताना सुरक्षा निकषांचे पालन झाले होते का, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत पावसाळ्यात वाहतुकीची गैरसोय होऊ नये यासाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था उभारण्याचे आश्वासन दिले. संबंधित सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मात्र, या सर्व घडामोडींमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित राहतो तो म्हणजे मंजुरी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण नसताना सार्वजनिक निधीतील काम प्रत्यक्षात सुरू करण्याची परवानगी कोणी दिली? तसेच या कामाची जबाबदारी कोणाकडे होती? एका निष्पाप कर्मचाऱ्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला या त्रुटींची जाणीव होणार का, अशी संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले असले तरी केवळ चौकशीच्या घोषणांवर प्रकरण पडदा टाकला जाणार की जबाबदारांवर प्रत्यक्ष कारवाई होणार, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

