(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील कामथे गावातील गणपती विसर्जन घाट परिसरात अज्ञात व्यक्तींनी हॉस्पिटलमधील धोकादायक जैववैद्यकीय कचरा नदीपात्रात टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कामथे गावातील नदी परिसर हा स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन वापराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. महिला कपडे धुण्यासाठी, शेतकरी जनावरांना पाणी पाजण्यासाठी तसेच नागरिक विविध कामांसाठी या परिसराचा वापर करतात. अशा लोकवस्तीला लागून असलेल्या नदीपात्रात वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
घटनास्थळी वापरलेल्या सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन, सुया आणि विविध प्रकारचे वैद्यकीय साहित्य मोठ्या प्रमाणात विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. हा कचरा संसर्गजन्य असण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता तो थेट नदीपात्रात टाकणे हे पर्यावरणीय नियमांचे गंभीर उल्लंघन मानले जाते. ग्रामस्थांच्या मते, अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. विशेषतः नदी परिसरात वावरणारी लहान मुले, महिला तसेच जनावरे यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, हा वैद्यकीय कचरा नेमका कोणत्या रुग्णालयातून अथवा आरोग्य संस्थेतून येथे आणून टाकण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने तातडीने तपास सुरू करावा, अशी मागणी होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभारण्याचीही अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
सरपंचांसह ग्रामस्थांची घटनास्थळी पाहणी
स्थानिक नागरिकांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर कामथे ग्रामपंचायतीच्या सरपंच अक्षदा कासार, हरी कासार, तेजस कदम तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी या गंभीर प्रकाराबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून, दोषी व्यक्ती किंवा संस्थेचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानल्या जाणाऱ्या या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

