(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील कुर्धे येथे जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत उभारण्यात येत असलेल्या पुलाचा स्लॅबचा भाग अचानक कोसळून एका तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. या दुर्घटनेमुळे पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या दुर्घटनेत आकाश शिवाजी काटे (वय २७, रा. क्रांतीनगर, रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कुर्धे गावातील लिंगायतवाडी आणि खोतवाडी यांना जोडणाऱ्या वहाळावर पूर्वी केवळ साकव असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत येथे नवीन पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी या पुलाचे काम सुरू करण्यात आले होते.
मात्र, पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असतानाही पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत होते. नुकताच पुलावर लोखंडी सळ्यांचे जाळे टाकून स्लॅबचे काम करण्यात आले होते. सोमवारी रात्री कुर्धे परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे वहाळालाही पाणी आले होते. मंगळवारी सकाळी चार ते पाच कामगार बांधकामस्थळी कामासाठी आले होते. स्लॅबखाली आधारासाठी लावण्यात आलेली पन्नी आणि साहित्य काढण्याचे काम सुरू असताना अचानक स्लॅबचा एक भाग कोसळला. इतर कामगारांनी प्रसंगावधान राखत बाजूला सरकल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र, आकाश काटे यांना सावरण्याची संधी मिळाली नाही. कोसळलेल्या स्लॅबखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून प्राथमिक माहिती घेतली.
दरम्यान, निर्माणाधीन पूल कोसळल्याने कामाच्या दर्जावर आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते का, तसेच तांत्रिक नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबत चौकशीची मागणी स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण बेंदरकर करीत आहेत.

