( रत्नागिरी )
रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी नार्को को-ऑर्डिनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रलंबित हद्दपारीच्या प्रकरणांवर नाराजी व्यक्त करत संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना पुढील दोन आठवड्यांत ही प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश दिले.
बैठकीला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून अंमली पदार्थविरोधी कारवाईचा आढावा घेतला. ते म्हणाले, “सर्व विभागांनी जबाबदारीने आणि समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. एमडीसारखे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी रसायने जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील कारखान्यांत उत्पादित होतात का, याची माहिती फॅक्टरी निरीक्षकांनी घ्यावी.”
तसेच, रसायनांची ओळख पटवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली. रसायनांची वाहतूक आणि त्यावरील नियंत्रण याबाबत संबंधित विभागांनी सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी चिपळूणसारख्या पर्यटनस्थळांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. “पर्यटकांची मोठी वर्दळ असलेल्या भागांत अंमली पदार्थांविरोधात अधिक कडक कारवाई होणे गरजेचे आहे. सर्व संबंधित विभागांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा,” असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, पोलीस आणि प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

