( दापोली )
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, दापोली यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप सोहळा नुकताच विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेच्या ५० वर्षांच्या यशस्वी, समृद्ध आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे तसेच दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगांवकर उपस्थित होते. डॉ. मकरंद करमरकर यांनी प्रभावी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
यावेळी कुलगुरू डॉ. संजय भावे, डॉ. तानाजीराव चोरगे आणि डॉ. जयवंत जालगांवकर यांनी मार्गदर्शन करताना सहकार चळवळीचे महत्त्व, कर्मचारी सहकारी संस्थांची भूमिका आणि बदलत्या काळात आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था उभारण्याची गरज अधोरेखित केली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. जीवन कदम यांनी संस्थेच्या ५० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेत संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्व संस्थापक सदस्य, माजी अध्यक्ष, माजी सचिव आणि कर्मचाऱ्यांचे योगदान अधोरेखित केले. यावेळी संस्थापक सदस्य, माजी पदाधिकारी तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्मरणिकेत संस्थेच्या पाच दशकांच्या कार्याचा आणि विकासाचा आढावा घेण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव सचिन मयेकर यांनी उपस्थित मान्यवर, सभासद आणि हितचिंतकांचे आभार मानले. ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.
सुवर्ण महोत्सवी समारोप सोहळा संस्थेच्या इतिहासातील एक अभिमानास्पद आणि संस्मरणीय पर्व ठरला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

