(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील कादवड धनगरवाडी येथे किरकोळ वादातून एका युवकावर मित्रानेच हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या मित्राने बॅटरी, काठी आणि दगडांचा वापर करून केलेल्या या हल्ल्यात सुनील बबन ढवळे (वय २९) हा युवक जखमी झाला आहे. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील ढवळे आणि काही साक्षीदार आपल्या घरासमोर मोकळ्या जागेत उभे असताना आरोपी अशोक बाबा शिंगाडे (वय २६, रा. कादवड धनगरवाडी) हा दारूच्या नशेत तेथे आला. त्याच्या हातात बॅटरी आणि काठी होती. त्याने सुनीलच्या लहान भाऊ बाबाला ‘आपल्या वाडीतील पन्ह्यात खेकडे पकडायला चल’ असे सांगितले.
मात्र आरोपी नशेत असल्याने सुनीलने आपल्या भावाला रात्रीच्या वेळी त्याच्यासोबत जाण्यास मनाई केली. या साध्या मनाईचा राग शिंगाडे याला आला आणि रागाच्या भरात त्याने हातातील ‘मानग्याची काठी’ सुनीलच्या डाव्या पायाच्या मांडीवर जोरात फेकली. एवढ्यावर तो न थांबता, हातातील बॅटरीचा उजेड सुनीलच्या चेहऱ्यावर मारला आणि जवळचे दोन दगड उचलून तोंडावर फेकून मारले. या हल्ल्यात सुनीलच्या हनुवटीला व कानाला दुखापत झाली आहे.
जखमी सुनील ढवळे यांनी १८ ऑक्टोबर रोजी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अशोक शिंगाडे याच्याविरुद्ध भादंवि कलम ११८(१), १२५, १२५(अ) अंतर्गत गुन्हा क्रमांक ६७/२०२५ नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

