(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरातील विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीनंतरही CJP ने आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय कोणताही तोडगा मान्य नाही. जर सरकारने निर्णय घेतला नाही, तर देशभरातील आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.”
देशभरात आंदोलनाचा विस्तार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह अनेक राज्यांत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
बिहार: पाटणा, बक्सर आणि भागलपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. पाटण्यात जेपी गोलंबर परिसरात वॉटर कॅननसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. विधानसभा आणि रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे.
राजस्थान: जयपूरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाशी संबंधित वकिलांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन केले. राजस्थान विद्यापीठातील विद्यार्थी नेते शुभम रेवाड यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू असून ते दुसऱ्या दिवशीही कायम होते.
उत्तर प्रदेश: प्रयागराजमध्ये वकिलांनी मोर्चा काढला, मेरठमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेचे आयोजन करण्यात आले, तर लखीमपूरमध्ये विद्यार्थ्यांनी प्रशासनाला गुलाब देऊन शांततापूर्ण निषेध नोंदवला. वाराणसीतील बीएचयूमध्येही आंदोलनाची तयारी सुरू आहे.
सरकारसोबत चर्चा, पण भूमिका कायम
केंद्र सरकारसोबतच्या बैठकीनंतर CJP ने सांगितले की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारकडून शनिवारी दुपारपर्यंत उत्तर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच NEET पेपरफुटीमुळे आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य आर्थिक मदत देण्याची मागणीही सरकारसमोर मांडण्यात आली. अभिजीत दिपके यांनी माध्यमांशी बोलताना हिंदीत, “इस्तीफे से कम कुछ मंजूर नहीं है,” असे सांगत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
‘हे आता देशातील तरुणांचे आंदोलन’
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेत आंदोलन शांत करण्याचे आवाहन केले असले तरी, CJP ने ते फेटाळले आहे. दिपके म्हणाले, “हे आंदोलन आता कोणत्या एका व्यक्तीचे राहिलेले नाही. हे देशभरातील तरुणांचे आंदोलन आहे. त्यामुळे राजीनाम्याशिवाय माघार नाही.”
बैठकीच्या ठिकाणावरूनही वाद
यापूर्वी केंद्र सरकारने चर्चा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी घेण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र CJP ने जंतर-मंतर किंवा तटस्थ ठिकाणीच बैठक घेण्याची भूमिका घेतली. अखेर दोन्ही बाजूंमधील दुसऱ्या फेरीची चर्चा कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे पार पडली.
शिक्षण मंत्रालयात मोठे बदल
दरम्यान, केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात प्रशासकीय फेरबदल करत उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली केली आहे. शालेय व उच्च शिक्षण विभागात नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, NEET पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर हे बदल महत्त्वाचे मानले जात आहेत.
पेपरफुटीविरोधात कठोर कायद्याची तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी नवीन कायदा आणण्याची घोषणा केली आहे. संबंधित विधेयकावर केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा होणार असून, पुढील आठवड्यात संसदेत ते सादर केले जाण्याची शक्यता आहे. या कायद्यात पेपरफुटी प्रकरणांमध्ये कठोर शिक्षेच्या तरतुदी आणि जलदगती न्यायालयांद्वारे सुनावणीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

