(रत्नागिरी / प्रतिनिधी)
माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याची विशेष सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या सभेला महासंघाचे राज्य सचिव श्री. समीर शिरवाडकर हे प्रमुख उपस्थित होते. सभेचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या वेळी जिल्हा अध्यक्ष मनोहर गुरव यांनी प्रमुख पाहुणे श्री. शिरवाडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष राज बोथरे, जिल्हा सचिव पद्मनाभ कोठारकर आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी महासंघाच्या भावी कार्ययोजनेवर सविस्तर चर्चा होऊन अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
राज्य सचिव श्री. शिरवाडकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक तालुक्यात व गावपातळीवर माहितीच्या अधिकाराची जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. शासकीय कार्यालयात पारदर्शकतेसाठी भेटीदरम्यान व्हिडिओ चित्रीकरण करणे आणि नोंदी व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. सभेत सर्व तालुक्यांमध्ये सदस्य नोंदणी वाढविणे, शासनाच्या परिपत्रकांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे, तसेच प्रलंबित कामांच्या पाठपुराव्याबाबत ठोस भूमिका घेण्याचे ठरविण्यात आले. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे व सचोटीने काम करून आपले अहवाल वेळोवेळी सादर करण्याचे ठरले.
या सभेला जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. उपस्थितांमध्ये संगमेश्वर तालुकाध्यक्ष शेखर जोगळे, उपाध्यक्ष सुनील करंडे, कार्याध्यक्ष प्रकाश खांडेकर, सचिव एकनाथ मोहिते, तसेच महिला विभागातून नसीरा काझी, संपदा जोशी, लता करंबेळे यांचा समावेश होता. तसेच लांजा तालुकाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, चिपळूण तालुकाध्यक्ष सुबोध चव्हाण, महिला विभाग अध्यक्षा स्वाती हडकर, राजापूर तालुकाध्यक्ष प्रशांत पवार, दापोली तालुकाध्यक्ष इकबाल मालवणकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा उपाध्यक्ष राज बोथरे यांनी सर्व मान्यवर, पदाधिकारी व उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर सभा संपन्न झाल्याची घोषणा करण्यात आली.

