(गावखडी / वार्ताहर)
प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू अंतर्गत आरोग्य उपकेंद्र पुनस यांच्या वतीने किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम उत्साहात राबविण्यात आला. या अंतर्गत वीरगाव येथील चिरेखाणीत गप्पी मासे सोडण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वीरगावच्या सरपंच सौ. वैदेही शांताराम वीर यांच्या हस्ते करण्यात आले. गप्पी मासे सोडण्यामागील उद्देश म्हणजे डासांच्या अळ्यांचे नियंत्रण करून मलेरिया, डेंग्यू आणि इतर किटकजन्य आजारांना प्रतिबंध करणे हा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन आरोग्य उपकेंद्र पुनसचे आरोग्य सेवक श्री. सुधीर लिंगायत यांनी केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबूचे आरोग्य निरीक्षक श्री. दिलीप विठ्ठल गुरव यांनी उपस्थित ग्रामस्थांना किटकजन्य रोगांपासून बचावासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, “आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे अधिक महत्त्वाचे आहे.” यावेळी ग्रामस्थांना कोरडा दिवस पाळणे, गटारे वाहती ठेवणे, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे, घरांच्या खिडक्यांना मच्छरदाणी बसवणे, पाण्याचे साठे टाळणे, ड्रममधील पाणी झाकून ठेवणे तसेच घराजवळील डबकी बुजविणे यासारख्या उपायांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
तसेच, पुणे, मुंबई किंवा किटकजन्य आजारांचे प्रमाण अधिक असलेल्या भागांतून आलेल्या व्यक्तींनी तातडीने आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले. आशा सेविका, आरोग्य कर्मचारी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रक्त तपासणी करून घेण्याचे मार्गदर्शन ग्रामस्थांना करण्यात आले.
या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आरोग्य विभागाच्या या जनजागृती मोहिमेचे कौतुक करण्यात येत आहे.

