(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या ७६ वर्षीय वृद्ध पित्यावर स्वतःच्या सावत्र मुलाने पैशांच्या वादातून लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. या हल्ल्यात वृद्ध पिता गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गंगाराम गनू घोडेकर (वय ७६, मूळ रा. पणोरे, ता. लांजा) हे सध्या रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते रेल्वे स्थानक परिसरात बसून दिवसभरात जमा झालेले पैसे मोजत होते. त्याच वेळी त्यांचा सावत्र मुलगा अर्जुन भिवा पवार (वय ३८) तेथे आला आणि खर्चासाठी पैशांची मागणी केली. मात्र, गंगाराम यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने अर्जुनने संताप व्यक्त करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली. एवढ्यावरच न थांबता त्याने वृद्ध वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. वाद अधिक चिघळल्यानंतर आरोपी अर्जुनने जवळच पडलेला लाकडी दांडका उचलून गंगाराम यांच्या डाव्या डोळ्याच्यावर तसेच उजव्या हाताच्या बोटांवर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात वृद्ध गंगाराम गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी गंगाराम घोडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपी अर्जुन पवार याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. रक्ताच्या नात्यातील या अमानुष घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

