(नवी दिल्ली)
केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेत अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची वार्षिक मर्यादा थेट 12 वरून 4 वर आणली आहे. घरगुती गॅसचा सरासरी वापर, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या एलपीजीच्या किमती आणि तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीण मल खनूजा यांनी सोमवारी दिली.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मे 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील प्रौढ महिलांना कोणतीही ठेव रक्कम न घेता एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. सुरुवातीला लाभार्थ्यांना दरवर्षी 14.2 किलो वजनाचे 12 अनुदानित सिलिंडर दिले जात होते. मात्र, गेल्या वर्षी ही संख्या कमी करून 9 सिलिंडर करण्यात आली होती. आता केंद्र सरकारने आणखी कपात करत अनुदानित सिलिंडरची मर्यादा केवळ 4 पर्यंत आणली आहे.
मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धसदृश परिस्थितीमुळे जागतिक इंधन दरांमध्ये मोठी वाढ होत असताना केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ (PMUY) अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानित एलपीजी सिलेंडरची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार, उज्ज्वला योजनेअंतर्गत आता वर्षभरात केवळ पहिल्या 4 गॅस सिलेंडरवरच 300 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना वर्षाला 9 सिलेंडरपर्यंत अनुदानाचा लाभ मिळत होता. त्यामुळे लाखो कुटुंबांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.
LPG सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सरकारचा निर्णय
जागतिक स्तरावर कच्चे तेल आणि एलपीजीच्या किमती झपाट्याने वाढत असल्याने तेल विपणन कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढला आहे. सध्या घरगुती एलपीजी सिलेंडरचा वास्तविक खर्च 1,600 रुपयांच्या पुढे गेला असून कंपन्यांना प्रत्येक सिलेंडरमागे सुमारे 700 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीण खानुजा यांनी सांगितले की, पात्र PMUY लाभार्थ्यांना 14.2 किलोच्या सिलेंडरवर 300 रुपयांचे अनुदान सुरू राहणार असले तरी ते वर्षातील फक्त चार सिलेंडरसाठी मर्यादित असेल. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला वार्षिक जास्तीत जास्त 1,200 रुपयांचेच अनुदान मिळणार आहे.
दिल्लीत LPG सिलेंडर 942 रुपयांवर
सध्या दिल्लीत उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना 14.2 किलोचा एलपीजी सिलेंडर 642 रुपयांत मिळत आहे, तर सामान्य ग्राहकांना त्यासाठी 942 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या आठवड्यातच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली होती. रविवारपासून (7 जून) दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असून जागतिक ऊर्जा संकटाचा थेट परिणाम भारतीय ग्राहकांवर होताना दिसत आहे.
सामान्य ग्राहकांनाही सरकारकडून दिलासा?
प्रवीण खानुजा यांनी स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्या तरी केंद्र सरकारकडून ग्राहकांना पूर्ण फटका बसू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केवळ उज्ज्वला लाभार्थीच नव्हे, तर इतर ग्राहकांनाही सरकारी हस्तक्षेपामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

