(पुणे)
शहरात एकीकडे गुन्हेगारी वाढत असतानाच सायबर गुन्ह्यांतही मोठी वाढ होताना दिसत आहे. पुण्यात खराडी परिसरात राहणाऱ्या एका महिला डॉक्टरला ऑनलाइन मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून तब्बल ३ कोटी ६० लाख रुपयांना गंडवण्यात आलं आहे. या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे खरे नाव अभिषेक शुक्ला असून तो मूळचा लखनऊचा रहिवासी आहे. मॅट्रिमोनियल वेबसाइटवरील बनावट प्रोफाइलद्वारे एका महिलेला ३.६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या सायबर क्राइम युनिटने भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन नागरिकाला अटक केली आहे.
‘शादी डॉट कॉम’वरून फसवणुकीचा जाळं
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची दिल्लीची असून सध्या पुण्यातील खराडी परिसरात राहत आहे. काही महिन्यांपूर्वी तिची ओळख प्रसिद्ध मॅट्रिमोनियल साईट ‘शादी डॉट कॉम’वरून ‘डॉ. रोहित ओबेरॉय’ या नावाने स्वत:ला ऑस्ट्रेलियन नागरिक म्हणवणाऱ्या आरोपीशी झाली. ओळखीचे रूपांतर लवकरच मैत्रीत, त्यानंतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. लग्नाचं आमिष देत आरोपीने महिलेशी जवळीक साधली. एवढंच नव्हे तर काही काळ दोघांनी एकत्र वास्तव्यही केलं.
पोटगीच्या पैशांवर नजर, व्यवसायात गुंतवणुकीचं आमिष
महिलेने तिच्या माजी पतीकडून मिळालेली ५ कोटी रुपयांची पोटगी ‘माइंडफुलनेस’ आणि ‘स्पिरिच्युअलिटी’ या कार्यक्रमांत गुंतवण्याचा निर्णय घेतला होता. ही माहिती मिळताच आरोपीने महिलेला विश्वासात घेत, तिच्या व्यवसायाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं आमिष दाखवलं. तो ‘इव्हॉन हॅन्दयानी’ आणि ‘विन्सेंट कुआण’ या बनावट नावांनी तिच्याशी संपर्कात राहिला आणि तिला भारत तसेच सिंगापूरमधील खात्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. यामध्ये एकूण ₹3,60,18,540 इतकी रक्कम आरोपीने उकळली.
बनावट मेलने दिला मृत्यूचा बनाव
आरोपीने व्हॉट्सअप आणि इतर मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे पीडित महिलेशी सतत संपर्क साधला, बनावट कागदपत्रे तयार केली आणि नंतर तिचा विश्वास मिळवण्यासाठी बनावट आपत्कालीन परिस्थिती निर्माण केली. पैसे मिळाल्यानंतर त्याने तोंडाचा कर्करोग असल्याचं सांगून महिलेकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. काही महिन्यांनी आरोपीने अचानक संपर्क तोडला. त्यानंतर ‘विन्सेंट’ नावाने महिलेला मेल करून ‘रोहित ओबेरॉय’चा मृत्यू झाल्याची बनावट माहिती दिली. या घटनेनंतर महिलेला संशय आला आणि तिने तात्काळ पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. नोव्हेंबर २०२४ मध्ये बीएनएस कलम ३१९(१) ३१९(२) ३१८(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ३१८(२) ३१८(४), आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांचा तपास आणि मुंबई विमानतळावर अटक
महिलेच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. तपासात संबंधित व्यक्तीचं खरे नाव अभिषेक शुक्ला असल्याचं निष्पन्न झालं. तो सध्या ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात वास्तव्यास होता. भारतात परतण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस (LOC) जारी केली होती. त्यानुसार, २५ जून रोजी सिंगापूरहून मुंबईला आल्यानंतर त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली.
३,१९४ महिलांशी संपर्क
आतापर्यंतच्या तपासात अभिषेक शुक्लाने ‘शादी डॉट कॉम’वर ३,१९४ महिलांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याने आणखी किती महिलांची फसवणूक केली आहे, याचा तपास सुरू आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून पुढील तपास सायबर गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलिसांनी, विशेषतः महिलांना, वैवाहिक वेबसाइट्सवर संभाषण करताना सावधगिरी बाळगण्याचे आणि सायबर क्राइम हेल्पलाइन (१९३०) किंवा cybercrime.gov.in पोर्टलद्वारे कोणत्याही संशयास्पद हालचालीची त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.