(मुंबई)
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले असून त्यात मराठी नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार कुवेतमध्ये अडकला होता. राज्य सरकारच्या हस्तक्षेपानंतर आता त्याला सुरक्षितपणे भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून केंद्र सरकारशी संपर्क साधला आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे अभिनयसह सुमारे 30 महाराष्ट्रीयन नागरिकांची सुटका शक्य झाली.
कुवेतमध्ये अडकले होते प्रवासी
अभिनय सुभेदार हे कुवेतमार्गे लंडनला जात होते. कुवेतमध्ये त्यांचा ट्रान्झिट थांबा असताना इराणकडून ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांमुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली. यानंतर कुवेतचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आणि अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली. त्यामुळे अभिनय आणि इतर काही भारतीय नागरिक कुवेतमध्ये अडकून पडले. आकाशात ड्रोन इंटरसेप्शनसारख्या घटना दिसू लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
विशाखा सुभेदार यांची भावनिक मदतीची हाक
या परिस्थितीत विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर करून मुलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आणि सरकारकडे मदतीची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने हालचाली सुरू केल्या. मुख्यमंत्री कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून प्रवाशांच्या सुरक्षित परतीसाठी प्रयत्न सुरू केले. या प्रक्रियेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनाही पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली.
कुवेतहून रियाधमार्गे भारतात परतण्याची व्यवस्था
अडकलेल्या नागरिकांना कुवेतहून रियाध (सौदी अरेबिया) मार्गे भारतात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अनेक प्रवाशांच्या व्हिसासंबंधी अडचणी निर्माण झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम महाजन यांनी पुढाकार घेत काही प्रवाशांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळवून देण्याची प्रक्रिया गतीमान केली. त्यानंतर अभिनय सुभेदारसह सुमारे 30 महाराष्ट्रीयन नागरिकांना कुवेतहून रियाधला जाण्याची परवानगी मिळाली. दरम्यान हे सर्व प्रवासी सुमारे 700 किलोमीटरचा 10 तासांचा प्रवास करून रस्त्याने सुरक्षितपणे रियाधला पोहोचले.
आज मुंबईत होणार आगमन
रियाधहून मुंबईकडे जाणाऱ्या विमानाने त्यांचा परतीचा प्रवास निश्चित करण्यात आला आहे. या विमानाचे उड्डाण 9 मार्च रोजी रात्री 8.40 वाजता (रियाध वेळ) म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री 11:10 वाजता झाले आहे. हे विमान आज 10 मार्चच्या पहाटे सुमारे 3 वाजता मुंबईत दाखल होणार असून अभिनय सुभेदारसह सर्व प्रवासी सुरक्षितपणे मायदेशी परतणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कुवेतमधील भारतीय दूतावासानेही महत्त्वाची मदत केली.

