बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. या बैठकीत एसआयआर प्रकरण, NEET पेपरफुटी, बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती आणि शेतकरी प्रश्न यांसह 5 प्रमुख मुद्द्यांवर एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्द्यांवर इंडिया आघाडी देशभर संघर्ष करणार असल्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला.
सोनिया-ममता गळाभेट चर्चेत
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंडिया आघाडीची ही पहिली मोठी बैठक होती. बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची गळाभेट विशेष चर्चेचा विषय ठरली. या बैठकीला राहुल गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, महबुबा मुफ्ती, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी व्हर्च्युअल माध्यमातून सहभाग घेत आपली भूमिका मांडली.
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
बैठकीत NEET पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यावर भर देण्यात आला. तसेच SIR संदर्भात लवकरच सरन्यायाधीशांना पत्र लिहिण्याचा निर्णयही घेण्यात आला. याशिवाय देशातील आर्थिक परिस्थिती, वाढती बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी इंडिया आघाडीने केली आहे.
उद्धव ठाकरे यांची PM फेसची मागणी
बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा राजकीय मुद्दा उपस्थित केला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. “देशाचे नेतृत्व करणारा चेहरा जनतेसमोर स्पष्टपणे मांडला पाहिजे,” असे मत ठाकरे यांनी व्यक्त केल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. आगामी ऑगस्ट महिन्यात पुन्हा इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याची माहितीही देण्यात आली.
इंडिया आघाडीच्या बैठकीतील 5 मोठे निर्णय
- एसआयआर प्रकरणावर लवकरच सरन्यायाधीशांना पत्र पाठवणार
- NEET पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
- आर्थिक स्थिती, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी
- प्रत्येक दोन महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक; पुढील बैठक हैदराबादमध्ये
- पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा समन्वय वाढवण्यासाठी दररोज बैठक
दरम्यान, इंडिया आघाडीच्या या बैठकीवर भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी टीका केली आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतूनच विरोधकांवर निशाणा साधत उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला.

