( ओमान )
मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग गडद होत असून अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाने गंभीर वळण घेतले आहे. युद्धविरामाची चर्चा सुरू असतानाच सोमवारी पुन्हा एकदा इराण आणि इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिका सुरू झाली. या वाढत्या संघर्षाचा फटका आता आंतरराष्ट्रीय समुद्री वाहतुकीलाही बसू लागला आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीजवळ ओमानच्या किनाऱ्यापासून अवघ्या 15 नॉटिकल मैल अंतरावर एका व्यापारी जहाजावर भीषण मिसाईल हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या जहाजावर 24 भारतीय खलाशी कार्यरत होते. हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रूममध्ये मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच जहाजाला आग लागली. त्यानंतर जहाजात पाणी शिरू लागल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.
याआधी रिकामे तेलवाहक जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडून दक्षिणेच्या दिशेने बरेच पुढे गेले होते. या जहाजावर भारतीय खलाशी होते. नेमका याच जहाजावर हल्ला झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराणचे जहाज समजून अमेरिकेकडूनच या रिकाम्या जहाजावर हल्ला झाला होता.
SOS कॉलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर
हल्ल्यानंतर जहाजावरील खलाशांनी तातडीने डिस्ट्रेस कॉल (SOS) जारी केला. फॉरवर्ड सीमेन यूनियन ऑफ इंडिया (FSUI) यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. आंतरराष्ट्रीय खलाशी संघटनेचे प्रतिनिधी मनोज यादव यांनी सांगितले की, “निलेश नावाच्या एका भारतीय खलाशाने मदतीसाठी फोन केला होता. त्याने सांगितले की जहाजाची लाइफबोट नष्ट झाली असून जहाजाचा एक भाग धुराने वेढलेला आहे. परिस्थिती अत्यंत भीषण होती.” यादव यांनी तातडीने DG Shipping आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर भारतीय प्रशासनाने ओमान सरकारशी समन्वय साधत बचावकार्य सुरू केले.
हेलिकॉप्टरद्वारे भारतीय खलाशांची सुटका
परराष्ट्र मंत्रालय (MEA), DG Shipping आणि ओमान प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अडकलेल्या 24 भारतीय खलाशांची अखेर हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित सुटका करण्यात आली. काही खलाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हल्लाग्रस्त जहाजावर पलाउ देशाचा झेंडा होता. मिसाईल हल्ल्यानंतर जहाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बचाव कार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा धोक्याच्या केंद्रस्थानी
होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील कच्चे तेल आणि एलपीजी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग मानला जातो. अमेरिका-इराण संघर्ष तीव्र झाल्यानंतर या भागात व्यापारी जहाजांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे जागतिक व्यापार आणि तेल बाजारावरही तणावाचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, इराण आणि इस्रायलमधील संघर्ष पुन्हा उफाळल्याने संपूर्ण जगाची चिंता वाढली असून मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

