( मुंबई )
भारतीय आयातीवर अमेरिकेने लादलेले ५० टक्के टॅरिफ उद्या (बुधवार, २७ ऑगस्ट) पासून लागू होणार आहे. कपड्यांपासून मासळीपर्यंत अनेक वस्तूंवर याचा थेट परिणाम होणार असून, निर्यातदारांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या या “टॅक्स टेररिझम” ला केंद्र सरकारकडून ठोस प्रत्युत्तर न मिळाल्याने उद्योगजगत आता हतबल झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
अमेरिका ही भारताची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ मानली जाते. भारताच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल २० टक्के हिस्सा अमेरिकेकडे जातो. टॅरिफ वाढल्यानंतर व्हिएतनाम, बांगलादेश आणि मेक्सिकोच्या तुलनेत भारतीय उत्पादने महाग ठरणार असल्याने भारतीय निर्यातीवर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
आज दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
या पार्श्वभूमीवर आज २६ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. निर्यातदारांवरील परिणामांचा आढावा घेऊन उपाययोजना ठरवण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान मोदींची भूमिका
“सर्व देश आर्थिक स्वार्थाचे राजकारण करत आहेत. भारतावरही दबाव टाकला जात आहे. पण कितीही दबाव आला तरी आम्ही मार्ग काढू आणि छोटे उद्योजक व शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करू,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील सभेत स्पष्ट केले.
टॅरिफचा सर्वाधिक परिणाम या क्षेत्रांवर
- कापड व ड्रेसिंग मटेरियल – अमेरिकेकडे जाणाऱ्या ऑर्डर्स आता आशियातील इतर देशांकडे वळण्याची शक्यता.
- हिरा व दागिने – आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ९.२ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती; टॅरिफनंतर निर्यात ठप्प, रोजगार धोक्यात.
- ऑटो पार्ट्स, फार्मा व इलेक्ट्रॉनिक्स – किंमती वाढल्याने कंपन्यांच्या नफ्यावर फटका.
- सीफूड्स (कोळंबी) – २०२४ मध्ये ८६.५ अब्ज डॉलर्सची निर्यात; टॅरिफनंतर घसरणीची भीती.
- ग्राहकोपयोगी वस्तू व चामडे – अमेरिकेच्या बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या अभियांत्रिकी वस्तू आणि चामड्याच्या उद्योगाला मोठा धक्का.
अमेरिकेने भारतीय आयातीवर लादलेल्या ५० टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन केले. अहमदाबाद येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खरेदी मोठ्या प्रमाणात वाढते. याच पार्श्वभूमीवर मोदींनी व्यापाऱ्यांना आवाहन करताना म्हटले, आपल्या दुकानांच्या बाहेर “येथे फक्त स्वदेशी वस्तू विकल्या जातात” असा बोर्ड मोठ्या अभिमानाने लावा. देशाला पुढे नेण्यात तुम्ही मोठे योगदान देऊ शकता. विदेशी माल विकणार नाही, असा निर्धार करा.
ते पुढे म्हणाले, “हा सणासुदीचा काळ आहे – नवरात्र, विजयादशमी, धनतेरस, दिवाळी – हे केवळ संस्कृतीचे उत्सव नाहीत, तर आत्मनिर्भरतेचे उत्सवही झाले पाहिजेत. आपण जे काही खरेदी करू ते ‘मेड इन इंडिया’ असेल, हा मंत्र आता सर्वांनी स्वीकारायला हवा.”

