(पंढरपूर / वृत्तसंस्था)
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस पंढरपुरात दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री सपत्नीक वारीत सहभागी होत वारकऱ्यांसोबत हरिनामाच्या गजरात तल्लीन झाले. आज आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर त्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची पारंपरिक शासकीय महापूजा पार पडली. यानिमित्ताने शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांनी राज्यातील राजकीय घडामोडी, NEET पेपरफुटी प्रकरण, लाठीचार्ज आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते आणि त्यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी हसतच स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. “मला दिल्लीला जायचं नाही, मला महाराष्ट्रातच राहायचं आहे. मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या एका वाक्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला, तर राजकीय चर्चांनाही नवे वळण मिळाले.
यानंतर त्यांनी विठ्ठलाच्या चरणी केलेल्या प्रार्थनेबाबत सांगताना, “विठ्ठलाच्या चरणी आम्ही हेच साकडं घातलं की महाराष्ट्र आणि देशातील प्रत्येक नागरिकाचे प्रश्न दूर व्हावेत. बळीराजा सुखी व्हावा. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व राज्यकर्त्यांना जनतेसाठी आयुष्यभर काम करण्याची सद्बुद्धी लाभावी,” अशी भावना व्यक्त केली.
NEET पेपरफुटी प्रकरणावर काय म्हणाल्या?
देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “या प्रकरणावर सरकार गंभीरपणे काम करत आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात होणार आहे. दोषींवरील शिक्षाही अधिक कठोर करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी सरकार सातत्याने नवे नियम आणि सुधारणा राबवत आहे.” CPJ आंदोलन, विद्यार्थी मारहाण आणि विविध कलाकारांच्या भूमिकेबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, “प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कलाकाराला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार त्यांनी वापरणे ही लोकशाहीचीच ताकद आहे.
अलीकडील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “त्या घटनेत काही समाजकंटकांनी पोलिसांवरही हल्ला केला आणि काही विद्यार्थ्यांनाही दुखापत झाली. तो अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय प्रसंग होता. अशा घटना पुन्हा घडू नयेत. कुणीही कायदा हातात घेतला असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.”
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरही प्रतिक्रिया
राज्यात चर्चेत असलेल्या ठाकरे बंधूंच्या राजकीय समीकरणांबाबत विचारले असता अमृता फडणवीस यांनी संयम भूमिका घेतली. “दोन ठाकरे एकत्र येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. इतके दिवस ते वेगळे होते, आता एकत्र आले असतील तर त्याकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात आलेल्या अमृता फडणवीस यांनी धार्मिक वातावरणात राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर भाष्य केले. विशेषतः “मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार” या त्यांच्या विधानाने दिल्लीतील संभाव्य राजकीय बदलांच्या चर्चांना नव्याने उधाण आले आहे.

