(देवळे / प्रकाश चाळके)
जैतापूर, नाटे आणि परिसरातील नागरिकांना पुण्याला जाण्यासाठी थेट एसटी बसची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन देवगड-पुणे (स्वारगेट) व्हाया सागवे-जैतापूर-नाटे-आडिवरे-रत्नागिरी-पाली-मलकापूर अशी नवीन एसटी बस सुरू करण्याची मागणी जैतापूरचे माजी सरपंच गिरीश करगुटकर यांनी राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्याकडे केली होती. या मागणीला यश मिळाले असून, ही बस पुढील आठवड्यापासून सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आमदार किरण सामंत नाटे येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांना या संदर्भातील निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाला तत्काळ प्रतिसाद देत आमदार सामंत यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाचे विभाग नियंत्रक (डीसी) यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच मागणीचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवून त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी विभाग नियंत्रकांनी संबंधित बससेवा पुढील आठवड्यात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या वेळी शिवसेना राजापूर तालुकाप्रमुख दीपक नागले, ज्येष्ठ नेते रविंद्र नागरेकर, सभापती नंदिनी कदम, पंचायत समिती सदस्या जान्हवी गावकर, पत्रकार राजन लाड, मिठगावणेच्या सरपंच आशा काजवे, जैतापूरचे माजी उपसरपंच प्रसाद करगुटकर, संदीप चव्हाण, सुनील करगुटकर, जितेंद्र गावकर, परेश भाटकर, मनीष करगुटकर, नाटे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लांजेकर, विभागप्रमुख मनोज आडविरकर, बंड्या चव्हाण, संदेश पाथरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या मागणीला जिल्हा परिषद सदस्या सोनाली ठुकरुल, पंचायत समिती सदस्या जान्हवी गावकर तसेच जैतापूर, कुवेशी, माडबन, मिठगावणे, अणसुरे, निवेली, सागवे आणि साखर येथील ग्रामपंचायती व लोकप्रतिनिधींचा पाठिंबा लाभला. सर्वांनी लेखी मागणीपत्र देऊन या प्रस्तावाला बळ दिले.
सामूहिक प्रयत्न आणि आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या तत्पर पाठपुराव्यामुळे या मार्गावर प्रथमच थेट पुणे एसटी सेवा सुरू होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल माजी सरपंच गिरीश करगुटकर यांनी आमदार किरण (भैय्या) सामंत यांचे तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.

