(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी येथील युवा चित्रकार सागर प्रदीप जाधव यांना युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. साखरपा विभाग पत्रकारांकडून हा पुरस्कार देण्यात येतो.
साखरपा पंचक्रोशीतीलच कला, क्रीडा, साहित्य, इतिहास सामाजिक अशा इत्यादी क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेल्या युवकाचा युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. पंचक्रोशीतील युवकांना स्फूर्ती मिळावी या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. ६ जानेवारी पत्रकार दिनाला या पुरस्काराचे वितरण केले जाते. गेले चार वर्षे हा पुरस्कार साखरपा विभाग पत्रकारांकडून दिला जात आहे. दिनांक 6 जानेवारी 26 रोजी कनकाडी येथे यावर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.
२०२६ ह्या आगामी वर्षासाठी कनकाडी (ता. संगमेश्वर) येथील युवा चित्रकार सागर जाधव यांची ह्या पुरस्कारासाठी एकमताने निवड करण्यात आली आहे. सागर जाधव यांनी देवरुख महाविद्यालयातून बीएची पदवी घेतली असून सध्या ते मुंबई येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयातून बीएफए चे तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहेत. सागर जाधव यांनी आजवर जलरंग, अॅक्रालिक रंग, ऑइल रंग यात काम केले आहे. तसेच कॅनव्हास, ऑइल पेपर, हँडमेड पेपर आदी माध्यमांवर त्यांनी काम केले आहे.
दिवाळी अंकांची मुखपृष्ठे तयार करण्याचा त्याना चांगला अनुभव आहे. प्रदर्शक आर्ट्स गॅलरीमध्ये झालेल्या प्रदर्शनात त्यांच्या निसर्ग चित्रांची निवड झाली होती.
केडी आर्ट नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळाले आहे. राज्यस्तरीय पोस्टर मेकिंग स्पर्धेतही त्यांना सुवर्णपदक मिळाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय संघात युवा महोत्सवासाठी त्यांची निवड झाली होती. विद्यापीठाच्या युथ फेस्टिव्हलमध्ये त्यांना रौप्य पदक मिळाले आहे.
बॉम्बे आर्ट सोसायटी ह्या नामांकित संस्थेमध्ये त्यांच्या चित्रांचा सहभाग आहे. यंदाच त्यांनी साकारलेल्या संगमेश्वर तालुक्यातील स्थळांच्या चित्रांची निवड नेहरू सेंटर येथे झालेल्या प्रदर्शनात झाली होती. सागर जाधव यांची चित्रे अमेरिका आणि इंग्लंड येथे विकली गेली आहेत.
येत्या ६ जानेवारी रोजी होणार्या पत्रकार दिनाला साखरपा पत्रकारांकडून सागर जाधव यांचा युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. त्यावेळी सागर जाधव यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.

