(संगमेश्वर / एजाज पटेल)
एका बाजूला गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण करणारी वडिलांची खाकी वर्दी, तर दुसऱ्या बाजूला न्यायालयात न्यायासाठी लढणारा लेकीचा काळा कोट… कर्तव्य, शिस्त आणि न्यायाचा हा सुंदर संगम आता बगळे कुटुंबात पाहायला मिळणार आहे. संगमेश्वरचे माजी आणि सध्या लांजा येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले नीलकंठ बगळे यांच्या कन्या मैथिली निकीता नीलकंठ बगळे हिने विधी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम श्रेणीत एलएलबी पदवी प्राप्त केली असून ती अधिकृतपणे ‘अॅडव्होकेट’ बनली आहे.
कोल्हापूर येथील ऐतिहासिक शहाजी लॉ कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करत मैथिलीने केवळ पदवी मिळवली नाही, तर आपल्या कुटुंबाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. तिच्या या यशामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बगळे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वडिलांच्या खाकीतून मिळाली प्रेरणा
मूळचे कनकनगर (कणकवली) येथील गोपाळकृष्ण बगळे व चंद्रकांत निमणकर यांची मैथिली ही लाडकी नात. पोलीस अधिकाऱ्याच्या घरातील शिस्त, समाजाप्रती असलेली निष्ठा आणि जनतेसाठी अहोरात्र झटणारे वडील नीलकंठ बगळे यांचा संघर्ष तिने लहानपणापासून जवळून अनुभवला.
सण-उत्सव बाजूला ठेवून समाजाच्या सुरक्षेसाठी धावणाऱ्या वडिलांच्या कामातूनच तिला कायद्याविषयी आकर्षण निर्माण झाले. वडिलांनी खाकीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे रक्षण केले, तर आपण न्यायालयातून वंचितांना न्याय मिळवून द्यावा, या भावनेतूनच मैथिलीने वकिली क्षेत्राची निवड केली.
प्रथम श्रेणीत यश; कुटुंबाचा अभिमान
महाविद्यालयीन शिक्षणात प्रथम श्रेणी मिळवत मैथिलीने आपल्या मेहनतीचा ठसा उमटवला. तिच्या या यशामुळे कनकनगरमधील बगळे आणि निमणकर परिवारासह चिंदरकर व पटकी देवी परिवारात आनंदाचे वातावरण आहे.
पीआय नीलकंठ बगळे यांनी संगमेश्वर आणि लांजा या दोन्ही ठिकाणी कर्तव्य बजावल्याने दोन्ही तालुक्यांशी त्यांचे घट्ट संबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे पोलीस दल, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, पत्रकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून बगळे परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“वडिलांच्या खाकीनेच दिली समाजासाठी लढण्याची प्रेरणा”
आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना अॅड. मैथिली बगळे म्हणाल्या, “माझ्या या यशाचे संपूर्ण श्रेय माझे माता-पिता आणि गुरुजनांना जाते. लहानपणापासून मी माझे वडील पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांना समाजासाठी झटताना पाहिले आहे. त्यांच्या खाकी वर्दीतील शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेने मला नेहमी प्रेरणा दिली.
वडिलांनी कायद्याच्या बळावर सामान्य नागरिकांचे संरक्षण केले. त्याच कायद्याचा अभ्यास करून न्यायालयाच्या माध्यमातून गरिबांना आणि शोषितांना न्याय मिळवून द्यावा, या विचारातून मी वकिली क्षेत्र निवडले.
आज वकिलीची पदवी मिळाल्यानंतर मला माझ्या वडिलांच्या खाकीचा आणि कुटुंबाचा अभिमान वाटतो. आता काळा कोट परिधान करून समाजातील वंचितांसाठी काम करत वडिलांच्या नावाला अधिक मान मिळवून देण्यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन.”

