(संगमेश्वर / एजाज पटेल)
उन्हाळा सुरू होताच जंगलात आग लागण्याच्या म्हणजेच वणव्याच्या घटना ऐकायला, वाचायला, पाहायला मिळतात. दरवर्षी शेकडो हेक्टरचं जंगल या आगीत नष्ट होतं. कोकणातील निसर्गसौंदर्य आणि दाट हिरवाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातही अलीकडच्या काळात वाढत चाललेल्या वणव्यांच्या घटनांमुळे येथील वनसंपदा धोक्यात येत असल्याचे चित्र समोर येत आहे. वणवा म्हटलं की डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या आकाशाला भिडू पाहणाऱ्या आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि त्या आगीत होरपळणारी अनेकानेक झाडे, कीटक आणि प्राणी. डोंगराळ भागात लागणाऱ्या वणव्यांमुळे उपयुक्त वृक्ष, वेली, औषधी वनस्पती तसेच लहान झुडपे जळून नष्ट होत आहेत. त्यामुळे जैवविविधतेवर परिणाम होण्याबरोबरच पर्यावरणीय संतुलन बिघडत जात आहे.
वनसंवर्धनासाठी वणवा प्रतिबंधक कायदे अस्तित्वात असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. काही ठिकाणी निष्काळजीपणामुळे तर काही ठिकाणी जाणीवपूर्वक वणवे लावले जात असल्याच्या तक्रारीही स्थानिकांकडून करण्यात येतात. परिणामी जंगलातील नैसर्गिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
संगमेश्वर तालुका डोंगर-दऱ्या आणि दाट जंगलांनी समृद्ध असून येथे विविध प्रकारची झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती तसेच अनेक पक्षी आणि प्राणी आढळतात. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत कोरडे गवत आणि वाढलेले तापमान यामुळे वणव्यांचा धोका अधिक वाढतो. एकदा आग लागली की काही तासांत मोठ्या क्षेत्रातील जंगल भस्मसात होते. या आगीत केवळ झाडेच नव्हे तर लहान प्राणी, पक्ष्यांची घरटी आणि वन्यजीवांचे अधिवासही नष्ट होतात.
वणव्याचा परिणाम केवळ जंगलापुरता मर्यादित राहत नाही. आगीमुळे जमिनीवरील सुपीक मातीचा थर जळून जातो आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप होते. याचा परिणाम शेतीवरही होतो. तसेच जंगलातील गवत आणि चाऱ्याचे नुकसान झाल्याने उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुपालकांनाही याचा फटका बसतो.
याशिवाय वणव्यांमुळे वातावरणातील तापमान वाढण्यासही हातभार लागतो. जंगलातील झाडे कार्बन शोषून घेण्याचे महत्त्वाचे काम करतात. परंतु आगीमुळे ही झाडे नष्ट झाल्यास वातावरणातील उष्णता वाढण्याचा धोका निर्माण होतो. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन दृष्टीने पाण्याच्या स्रोतांवर आणि जलसाठ्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यात वणव्यांविषयी व्यापक जनजागृती करणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. ग्रामसभांद्वारे, शाळा-महाविद्यालयांमधील मार्गदर्शन कार्यक्रमांद्वारे तसेच युवक मंडळे आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वणव्यांचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. आग टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, आग लागल्यास काय करावे आणि कायद्यांतर्गत कोणती शिक्षा होऊ शकते याबाबतही नागरिकांना माहिती देणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, स्थानिक तरुण आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन वणवा प्रतिबंधासाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे. जंगल परिसरावर लक्ष ठेवणे, आग लागल्याची माहिती तातडीने वन विभागाला देणे तसेच प्राथमिक स्तरावर आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक पातळीवर यंत्रणा उभारणे या उपाययोजनांमुळे मोठे नुकसान टाळता येऊ शकते.
संगमेश्वर तालुक्याला लाभलेले निसर्गसौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी वनसंवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही हा परिसर महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र जंगलांचे नुकसान झाले तर या संधींवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन आणि वणव्यांवर नियंत्रण या दोन्ही बाबींवर प्रशासन, वन विभाग, ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करणे ही काळाची गरज असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.

