(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रस्ते विकास आणि दिशादर्शक फलकांतील त्रुटींमुळे कायमच टीकेचे धनी ठरणाऱ्या महामार्ग विभागाने पुन्हा एकदा चर्चेला निमंत्रण दिले आहे. रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नुकत्याच उभारण्यात आलेल्या एका दिशादर्शक फलकावर रत्नागिरी जिल्ह्यात अस्तित्वात नसलेल्या ‘तुंबाड’ गावाचा उल्लेख करण्यात आल्याने नागरिकांसह वाहनचालकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकारामुळे महामार्ग विभागाच्या नियोजन, पडताळणी आणि कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याशी कोणताही भौगोलिक संबंध नसताना ‘तुंबाड’ हे नाव अधिकृत दिशादर्शक फलकावर झळकल्याने हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. फलकाचे छायाचित्र विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून, त्यावर विनोदी प्रतिक्रिया आणि उपरोधिक टीकाही होत आहे. महामार्गावरील दिशादर्शक फलक हे वाहनचालकांना अचूक मार्गदर्शन करण्यासाठी असतात. मात्र चुकीची माहिती देणारे फलक उभारले गेल्यास ते मार्गदर्शनाऐवजी दिशाभूल करणारे ठरतात. त्यामुळे संबंधित फलकावरील माहितीची पडताळणी कोणी केली, काम पूर्ण होण्यापूर्वी गुणवत्ता तपासणी झाली होती का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महामार्ग विभागाच्या अशा त्रुटींची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक ठिकाणी चुकीची गावनावे, अंतरातील तफावत आणि दिशादर्शक फलकांतील गोंधळामुळे विभागावर टीकेची झोड उठली होती. त्यातून कोणताही धडा न घेतल्याचे या नव्या प्रकारातून पुन्हा एकदा समोर आले आहे. दरम्यान, ‘तुंबाड’चा हा फलक पाहिल्यानंतर नागरिकांकडून ‘तुंबाडची मंजुळा आता रत्नागिरीतच आली काय?’ अशा मिश्किल प्रतिक्रिया उमटत आहेत.
सोशल मीडियावर या फलकाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन फलकातील चूक दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये अशा प्रकारच्या प्राथमिक स्वरूपाच्या चुका होत असतील, तर प्रत्यक्ष कामांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

