(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील श्री देवी भैरी भगवती मंदिरात सालाबादप्रमाणे उद्या शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी श्री देवी भैरी भगवती मातेचा पौष पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. भगवतीनगर येथील श्री देवी भैरी भगवती सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने या पौष पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री देवी भैरी भगवती मातेच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी नऊ वाजता देवीची विधीवत पूजा, देवीला रूपे लावणे, रात्री सात वाजता दीपोत्सव, देवीच्या भोवत्या, साडेसात वाजता गोंधळ आणि रात्री दहा वाजता कोकणचा साज संगमेश्वरी बाज (तुफान विनोदी लोकनाट्य) कार्यक्रम सादर होणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमांना उपस्थित राहून भगवतीनगर परिसरातील सर्व भक्तांनी उत्सवाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन श्री देवी भैरी भगवती सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने (भगवतीनगर, ता.जि.रत्नागिरी) करण्यात आले आहे. या पौष पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने भगवती मातेच्या मंदिर परिसरात यात्रा उत्सव ही साजरा होणार आहे. या निमित्ताने भाविकांना विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद घेता येणार आहे. दरवर्षी हा पौष पौर्णिमा उत्सव परिसरातील भक्तगणांसाठी खास आकर्षण ठरतो.
या उत्सवासाठी श्री देवी भैरी भगवती सार्वजनिक उत्सव समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्री देवी भैरी भगवती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व मंदिर परिसरात लक्षवेधी सजावट करण्यात आली असून परिसरातील भाविकांना उत्सवाचा लाभ अत्यंत सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी उत्सव समितीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत आहेत.

