(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून लघवीसाठी पाच रुपये शुल्क आकारले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ठाकरे युवासेना आक्रमक झाली आहे. या संदर्भात युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सुरेश सावंत यांनी कोंकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट यांची भेट घेऊन निवेदन सादर करत तातडीने कारवाईची मागणी केली.
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील ‘पे अँड यूज टॉयलेट’च्या फलकावर लघवीसाठी प्रति व्यक्ती पाच रुपये शुल्क आकारले जात असल्याचे नमूद करण्यात आले असून, कंत्राटदाराकडून प्रवाशांकडून सक्तीने ही रक्कम वसूल केली जात असल्याचा आरोप युवासेनेकडून करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे स्थानकांवरील लघवीची सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत असणे बंधनकारक आहे. मात्र, स्थानकावरील कंत्राटदार नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
“दररोज हजारो प्रवासी, विशेषतः कोकणात येणारे चाकरमानी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवाशांना या बेकायदेशीर वसुलीचा फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेला हा प्रकार संतापजनक आहे,” अशी प्रतिक्रिया प्रसाद सावंत यांनी व्यक्त केली. युवासेनेकडून प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. लघवीसाठी आकारले जाणारे शुल्क तातडीने बंद करून सुविधा पूर्णपणे मोफत करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर दंडात्मक कारवाई करावी तसेच ‘लघवीसाठी कोणतेही शुल्क नाही’ असे स्पष्ट फलक स्थानक परिसरात लावावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावर तातडीने कार्यवाही न झाल्यास प्रवाशांच्या हक्कांसाठी रेल्वे स्थानकावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही युवासेनेकडून देण्यात आला आहे. “कारवाई झाली नाही तर ठेकेदाराचा माणूस आतमध्ये दिसणार नाही,” असा इशारा प्रसाद सावंत यांनी भेटीदरम्यान दिल्याचे सांगण्यात आले. याचवेळी रेल्वे स्थानक रोडवरील दुभाजकामध्ये वाढलेल्या झाडांच्या फांद्या वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत असल्याने त्या छाटण्याची मागणीही करण्यात आली. या वेळी रितेश लोखंडे, निलेश पवार, साई गावडे, निखिल बने आणि ओमकार कारेकर उपस्थित होते.
ठाकरेसेनेच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू
सामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर ठाकरे सेनेने आक्रमक आणि संघर्षशील भूमिका घेतल्याचे चित्र सध्या रत्नागिरीत पाहायला मिळत आहे. रेल्वे स्थानकावरील प्रवाशांकडून होणारी कथित बेकायदेशीर वसुली, रस्ते सुरक्षेचे प्रश्न, स्थानिक नागरी सुविधांतील त्रुटी अशा विविध मुद्द्यांवर पक्षाने थेट प्रशासनाला धारेवर धरत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. केवळ निवेदनापुरते मर्यादित न राहता, गरज पडल्यास आंदोलनाचा इशारा देत ठाकरे सेना जनतेच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवत आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील नागरी प्रश्नांवर ठाकरे सेनेने आक्रमक पवित्रा स्वीकारल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

