(रत्नागिरी / प्रतिनिधी)
नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असताना महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शिंदेसेनेने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत पहिल्या टप्प्यातील नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र भाजपची अधिकृत यादी अद्यापही जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे. आज (शनिवार, १५ जुलै) रोजी महायुतीकडील उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी उमेदवारांची यादी जाहीर करताना संपर्कप्रमुख यशवंत जाधव, आमदार किरण सामंत, शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, माजी जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि माजी नगराध्यक्ष प्रदीप (बंड्या) साळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शिंदेसेनेच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांमध्ये निमेश नायर (प्रभाग २-ब), राजन शेट्ये (प्रभाग ३-ब), सौरभ मलुष्टे (प्रभाग ५-अ), गणेश भारती (प्रभाग ७-अ), श्रद्धा हळदणकर (प्रभाग ७-ब), दत्तात्रय विजय उर्फ बाळू साळवी (प्रभाग ८-ब), विजय गोविंद खेडेकर (प्रभाग ९-अ), आफ्रीन उबेद होडेकर (प्रभाग १३-अ) आणि सुहेल महम्मद साखरकर (प्रभाग १३-ब) या नावांचा समावेश आहे.
दरम्यान, भाजपकडून मानसी करमरकर, वर्षा ढेकणे, राजेश तोडणकर, नितीन जाधव, समीर तिवरेकर आणि सुप्रिया रसाळ यांना उमेदवारी दिल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात असली तरी उशिरापर्यंत भाजपने कोणतीही अधिकृत यादी जाहीर केली नव्हती. भाजपमध्ये उमेदवारीची विभागणी आणि स्थानिक समीकरणांबाबत असंतोष असल्यानेच यादी जाहीर करण्यात विलंब होत असल्याची चर्चा आहे.
भाजपच्या अंतर्गत वर्तुळातही नाराजी शिगेला पोहोचली आहे. शहरातील काही कार्यकर्त्यांना त्यांच्या मूळ भागाऐवजी इतर प्रभागांत उमेदवारी देण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात असून इच्छुकांची संख्या ६५ तर प्रत्यक्ष उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांची संख्या फक्त ६ असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशिष्ट गटाला प्राधान्य देत इतरांना डावलले जात असल्याच्या आरोपांमुळे पक्षांतर्गत मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील हालचालींना वेग आला असून अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने वळतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

