(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पावस-रत्नागिरी मार्गावरील भाटये येथे भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने धावणाऱ्या कारने स्कूटरला दिलेल्या जोरदार धडकेत दोन महिला आणि एका सहा वर्षीय चिमुरडीसह तिघेजण जखमी झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या अपघातप्रकरणी कार चालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. तेजश्री अमित मोहिले (वय ४०) या १० मे २०२६ रोजी दुपारी आपल्या हिरो प्लेझर स्कूटरवरून (एमएच ०८ एई ८५६८) कुर्ली येथे जात होत्या. त्यांच्यासोबत सौ. तीर्था चंद्रभूषण मरकर (वय ६२) आणि सहा वर्षीय कु. माहिषा अमित मोहिले प्रवास करत होत्या. सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची स्कूटर भाटये येथील हॉटेल आनंदसमोरील मार्गावर पोहोचली. याचवेळी पावसकडून रत्नागिरीच्या दिशेने येणारी मारुती स्विफ्ट डिझायर (एमएच ०५ एफजे ३१९८) भरधाव वेगाने धावत होती. चालक अक्षय दत्ताराम वारीसे (वय ३१, रा. गोळप, गोठणेवाडी) याने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहनावरचे नियंत्रण गमावत कार थेट चुकीच्या बाजूला नेल्याचा आरोप आहे. परिणामी समोरून येणाऱ्या स्कूटरला कारची समोरासमोर जोरदार धडक बसली.
धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की स्कूटरवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात तेजश्री मोहिले, तीर्था मरकर आणि लहानगी माहिषा मोहिले या जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, काहींना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर या घटनेची मोटार अपघात नोंदवहीत प्राथमिक नोंद करण्यात आली होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद तुकाराम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ जून रोजी कार चालक अक्षय वारीसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेग, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि चुकीच्या दिशेने वाहन चालविण्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.

