(सातारा)
पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात हृदयद्रावक घटना घडली असून कोयना नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. आर्यन अनिल कदम (वय 16) आणि करण दाजी कदम (वय 14, रा. गाढखोप, ता. पाटण) अशी मृत मुलांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे कोयनानगर आणि पाटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
पोहताना खोल डोहाचा अंदाज न आल्याने दुर्घटना
कोयना धरणाच्या भिंतीपासून जवळ असलेल्या गाढखोप गावातील आर्यन आणि करण हे दोघेही शाळकरी मित्र कोयना नदीत पोहण्यासाठी गेले होते. मात्र नदीत पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही अचानक खोल डोहात गेले आणि बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गाडखोप गावातील एकाच गल्लीतील पाच-सहा मुलं नदीकडं गेली होती. त्यात करण आणि आर्यन या दोघांना साधारण पोहता येत होतं. एकजण पहिल्यांदा पोहायला गेला. तो बुडू लागल्यानं त्याला वाचवायला दुसरा गेला. परंतु, दुर्दैवानं दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
उपलब्ध माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वीच कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे कोयना नदीची पाणीपातळी वाढली होती. वाढलेल्या पाण्यामुळे नदीतील खोल भागाचा अंदाज दोन्ही मुलांना आला नसावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शोधमोहीम राबवत मृतदेह बाहेर काढले
घटनेची माहिती मिळताच कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. के. ओलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नदी परिसरात तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. तासाभराच्या प्रयत्नांनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेची नोंद कोयनानगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. एकाच गावातील दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गाढखोप गावासह संपूर्ण पाटण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सध्या कोयना धरणातून 1050 क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने नदीची पाणीपातळी वाढली आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना आणि युवकांना खोल पाण्यात न उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

