(नवी दिल्ली )
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर सध्या आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा येत्या मार्च महिन्यात पार पडणार असून, या खास प्रसंगाचे निमंत्रण देण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली.
या भेटीचे फोटो सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत सचिन यांनी लिहिले की, “अर्जुन आणि सानियाच्या विवाह समारंभासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आमंत्रित करण्याचे आम्हाला सौभाग्य लाभले. या नवदाम्पत्याला दिलेल्या आशीर्वादांसाठी आणि मोलाच्या सल्ल्यासाठी मोदीजींचे मन:पूर्वक आभार.” या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी तेंडुलकर कुटुंबाशी आपुलकीने संवाद साधत अर्जुनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी सानिया चंडोक ही मुंबईतील सुप्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब हॉस्पिटॅलिटी आणि खाद्य उद्योगात मोठे नाव असून ब्रुकलिन क्रीमरी हा प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँड तसेच इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्सची मालकी त्यांच्या समूहाकडे आहे. सानिया चंडोक स्वतः वेटरनरी टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे. अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला होता.
अर्जुन आणि सानियाच्या लग्नाचे विधी ३ मार्चपासून सुरू होणार असून ५ मार्च रोजी मुंबईत शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. या आधी सचिन तेंडुलकर यांनी पत्नी अंजली यांच्यासह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही त्यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानी भेट घेऊन लग्नाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाला राजकीय, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २५ वर्षीय अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना पदार्पण केले होते. मात्र आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी लखनौ सुपर जायंट्स संघाने त्याला ट्रेड करून आपल्या ताफ्यात सामील केले आहे. आता नव्या संघासोबत आणि आयुष्याच्या नव्या इनिंगमध्ये अर्जुन तेंडुलकर कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे.

