( मुंबई )
चेन्नईतील गोल्डन बीच येथे शनिवारी घडलेल्या समुद्र दुर्घटनेत महाराष्ट्रातील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या समुद्रात शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून गेली होती. या घटनेनंतर बेपत्ता असलेल्या जळगाव जिल्ह्यातील 24 वर्षीय जय पाटील यांचा मृतदेह सोमवारी किनारपट्टीवर आढळून आला. एकुलत्या एक मुलाचा मृतदेह आढळून आल्यामुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यापूर्वी भंडारा जिल्ह्यातील मयुरी हरिश्चंद्र चौधरी हिचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता.
जय हा पाळधी तालुका जामनेर येथील नरेंद्र रामलाल पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. वडील नरेंद्र पाटील हे शेतकरी असून आई ही पाळधी येथील नाईक विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सध्या जय पाटील यांच्या बहिणीचे बारावीचे पेपर सुरू आहेत, तर जय हा इंटर्नशिपसाठी चेन्नई इथं गेला होता. चेन्नई येथील कॉग्नीझंट या आयटी कंपनीत जय हा इंटर्नशिप करत होता.
ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी घडली. आयटी सेवा कंपनी Cognizantमध्ये इंटर्नशिप करणारे तीन तरुण ईस्ट कोस्ट रोडवरील कांथाट्टूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोल्डन बीचवर फिरायला गेले होते. किनाऱ्याजवळ थांबून सेल्फी घेत असताना अचानक आलेल्या उंच आणि शक्तिशाली लाटांनी त्यांना समुद्रात ओढले. जय पाटील हा तामिळनाडू पोलिस, किनारी सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक बचाव पथकांनी राबवलेल्या सखोल शोध मोहिमेनंतर शेजारच्या गावाजवळील समुद्र किनाऱ्यावर सापडला.
गोल्डन बीच हा अचानक येणाऱ्या उंच लाटा आणि धोकादायक रिप करंटसाठी ओळखला जातो. याठिकाणी यापूर्वीही अशा प्रकारच्या बुडण्याच्या घटना घडल्या आहेत.
एकीचा मृत्यू, एक जखमी, जय बेपत्ता
या घटनेनंतर तामिळनाडू पोलिस, अग्निशमन दल, तटरक्षक दल आणि स्थानिक बचाव पथकांनी तातडीने शोध व बचाव कार्य सुरू केले. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील वरथी गावातील रहिवासी मयुरी हरिश्चंद्र चौधरी (वय 23) हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. राज केदारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र जय पाटील समुद्रात अधिक दूर ओढला गेल्याने तो बेपत्ता झाला होता. सोमवारी जयचा मृतदेह सापडल्याने या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे.
मयुरी चौधरी हिच्यावर सोमवारी सायंकाळी तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. चेन्नईमध्ये शवविच्छेदन झाल्याने कुटुंबीयांना तातडीने अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मयुरीने नांदेडमधील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातून एमटेक पदवी घेतली होती आणि याच वर्षी फेब्रुवारीत चेन्नई येथे इंटर्नशिपसाठी रुजू झाली होती. घटनेच्या अवघ्या दोन तास आधी तिने आईशी फोनवर संवाद साधत मजेत असल्याचे सांगितले होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडू सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून शोध व बचाव कार्याचा आढावा घेतला होता. जय पाटीलच्या शोधासाठी कसोशीने प्रयत्न वेगवान करण्याचे आदेशही त्यांनी केले होते. सोमवारी जयचा मृतदेह सापडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या दुर्दैवी घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान, या दुर्घटनेच्या नेमक्या कारणांची चौकशी सुरू असून पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर विशेषतः सेल्फी घेताना अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

