(खेड /रत्नागिरी)
खेड तालुक्यातील नारंगी फाटा परिसरात जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून दोन गटांमध्ये झालेला वाद हिंसक वळणावर पोहोचल्याची घटना उघडकीस आली आहे. लोखंडी पाईप, बांबू आणि लाथाबुक्क्यांनी झालेल्या या तुफानी मारहाणीत सहाजण जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी परस्पर गुन्हे दाखल केले आहेत.
पहिली घटना १३ मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. ऋतिक सुनील जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या भावाच्या वाहनात गुरे भरल्याचा संशय घेत आरोपींनी नारंगी फाट्याजवळ वाहन अडवून वाद घातला. वाद चिघळल्यानंतर आरोपींनी ऋतिक यांच्या भावाच्या कपाळावर धारदार किंवा कठीण वस्तूने वार करून जखमी केले, तर ऋतिक यांच्या खांद्यावर बांबूने प्रहार करण्यात आला. या प्रकरणी त्रुपेश निंबाळकर, रिक्षाचालक चव्हाण आणि खेडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर काही वेळातच दुसऱ्या गटाकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. प्रसाद प्रकाश बर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने ते आपल्या सहकाऱ्यांसह नारंगी फाट्यावर गेले होते. तेथे त्यांनी सूरज जाधव याला अडवून विचारणा केली असता वाद निर्माण झाला. या वादातून सूरज जाधव आणि ऋतिक जाधव यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच लोखंडी पाईपने हल्ला करून प्रसाद बर्गे यांना पुलावरून ढकलून दिल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या परस्पर संघर्षात एकूण सहाजण जखमी झाले असून परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खेड पोलीस घटनास्थळाची पाहणी करून दोन्ही बाजूंच्या तक्रारींचा तपास करत आहेत. जनावरांच्या वाहतुकीच्या संशयातून उफाळलेल्या या संघर्षामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

