(खेड)
ज्ञानदानाच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडवणाऱ्या, विद्यार्थीप्रिय आणि सेवाभावी शिक्षिका रसिका रमेश रेवाळे (खांडेकर) यांना कुणबी सेवा संघ, दापोली यांच्या वतीने सेवावृत्ती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. उत्कृष्ट प्राथमिक शिक्षिका म्हणून हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांचे प्रस्ताव आले होते. त्यामधून रसिका रेवाळे यांची निवड होणे हे खेड तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे.
रसिका रेवाळे मॅडम यांनी आपल्या अध्यापन कारकिर्दीची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून केली. त्यानंतर जिल्हा बदलीने त्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आल्या. शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा मार्गदर्शनात त्यांचा विशेष नावलौकिक आहे. मंडणगड तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवून दिले. ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत त्यांच्या तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत यश संपादन केले आहे.
मुळच्या खेड तालुक्यातील वरवली येथील रहिवासी असलेल्या रेवाळे मॅडम सध्या जिल्हाअंतर्गत बदलीने खेड तालुक्यातील आंबवली प्रभाग शाळेत कार्यरत आहेत. अल्पावधीतच त्या आंबवली शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षिका ठरल्या. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना लहान वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख करून देत त्यांनी बीडीएस, एमटीएस, आयटीएस अशा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून दिले. बीडीएस परीक्षेत विद्यार्थ्यांनी गोल्ड, सिल्व्हर व ब्रॉन्झ मेडल मिळवले असून एमटीएस परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश मिळवून विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय प्रदर्शनात सहभाग नोंदवला. 2024 मध्ये व्हिडिओ मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक, निपुण अंतर्गत गणित विषयातील व्हिडिओ मेकिंग स्पर्धेत खेड तालुक्यात प्रथम क्रमांक व जिल्हास्तरापर्यंत मजल अशी अनेक यशस्वी कामगिरी आंबवली शाळेने केली आहे. आयटीएस परीक्षेचा 100 टक्के निकाल लावत शाळेचे नाव तालुक्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळकपणे उमटवले आहे.
गतवर्षी आंबवली शाळेला रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला. या यशामागे मुख्याध्यापक श्रीकृष्ण खांडेकर सर आणि रसिका रेवाळे मॅडम यांचे अथक परिश्रम आहेत. गेल्या तीन वर्षांत शाळेसाठी लाखो रुपयांचा शैक्षणिक निधी उभारण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवरही मदत केली.
केवळ पुस्तकी ज्ञानापुरते न थांबता विद्यार्थ्यांना सामाजिक, व्यवहारिक आणि जीवनोपयोगी ज्ञान देणारे उपक्रम राबवणे ही त्यांची खास ओळख आहे. आपल्या दोन्ही मुलींना मराठी शाळेत शिक्षण देत त्यांनी पालकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांची कन्या चिन्मयी सध्या आंबवली शाळेत इयत्ता चौथीत शिकत आहे.
शैक्षणिक कार्यासोबतच रसिका रेवाळे मॅडम महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या खेड तालुका महिला प्रतिनिधी म्हणूनही सक्रिय आहेत. संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो.
“शिक्षकी पेशा ही नोकरी नसून सेवा आहे” या भावनेतून कार्य करणाऱ्या, मुलांमध्ये देव पाहणाऱ्या या आदर्श शिक्षिकेला पुढील वाटचालीसाठी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या असून देवी काळकाई चरणी त्यांच्या उत्तरोत्तर यशासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.

