(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील कोकण नगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहतुकीदरम्यान मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर नगरसेवक केतन शेट्ये आणि नगरसेविका फौजीया मुजावर यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
कोकण नगर परिसरातील नागरिकांकडून रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला होता. नागरिकांच्या या समस्येची गांभीर्याने दखल घेत नगरसेवक केतन शेट्ये आणि नगरसेविका फौजीया मुजावर यांनी प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत संबंधित यंत्रणेने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे परिसरातील रस्ते अधिक सुरक्षित आणि सुकर होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः दैनंदिन प्रवास करणारे वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे.
दरम्यान, रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी भविष्यातही सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही नगरसेवक केतन शेट्ये आणि नगरसेविका फौजीया मुजावर यांनी दिली. नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता दाखवत केलेल्या या पाठपुराव्यामुळे कोकण नगर परिसरातील विकासकामांना नव्याने गती मिळाल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

