(गणपतीपुळे / वैभव पवार)
कोकण मराठी साहित्य परिषदचे सभासद, ज्येष्ठ नाटककार, मालवणी सम्राट, वस्त्रहरण नाटकाचे लेखक, मालवणी भाषेला जागतिक रंगभूमीचा सन्मान मिळवून देणारे मराठी नाट्य क्षेत्रातील मानबिंदू गंगाराम गवाणकर यांचे मंगळवारी वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्य व लेखन क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे मालगुंड पुस्तकाचे गाव या कार्यक्रमाला ते राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे समवेत प्रमुख अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित होते. यावेळी त्यांनी मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव हा सन्मान मिळाल्याबद्दल मालगुंड ही खऱ्या अर्थाने साहित्याची नगरी असून तिला आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कवी केशवसुतांच्या मराठी साहित्याचा स्पर्श झाल्याचे गौरवोद्गार आपल्या मनोगताप्रसंगी काढले होते. त्यांच्या विशेष उपस्थितीच्या आणि नाट्य क्षेत्रातील अविस्मरणीय आठवणी मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषद शाखा परिवार आणि कवी केशवसुत स्मारक संकुलाच्या वतीने जाग्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना कोमसाप परिवार मालगुंड आणि कवी केशवसुत स्मारक संकुल यांचेवतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
या निधनाप्रसंगी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी शोक व्यक्त करताना सांगितले की, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या निधनाने लेखन आणि नाट्य क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांची मालगुंड येथे केशवसुत स्मारकात झालेली भेट कोमसाप आणि केशवसुत स्मारक संकुल परिवारासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने आमच्या दोन्ही परिवारावर शोककळा पसरली आहे.
फोटो: मालगुंड येथे पुस्तकांचे गाव कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्यासमवेत ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर उपस्थित असताना.

