(पाली / वार्ताहर)
तालुक्यातील पाली-पाथरटचे ग्रामदैवत व कोकणातील प्रसिध्द पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा नुकताच मुख्य मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात पार पडला.या सोहळ्यासाठी राज्यासह देशविदेशातील भाविकांनी हजेरी लावून, श्रींची सेवा केली. उत्सव काळात दररोज धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती.
यावर्षीचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा चैत्र शु.११ ते चैत्र वद्य १ शके १९४८ दि. २९ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत संपन्न झाला. यंदाच्या वर्षी चैत्रोत्सवाची सेवा समस्त सतीश नवाथे, अंबरनाथ यांनी केली. उत्सव काळात दररोज सकाळी वैयक्तिक पुजा, अभिषेक, एकादष्णी, लघुरूद्र, महारूद्र, यज्ञयागादी कर्मे आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असत. त्यानंतर दुपारी नैवेद्य,आरती व मंत्रपुष्प,रूपे लावणे व धुपारती व आरती, मंत्रपुष्पांजली व नामजप, मंत्रजागर, कीर्तन, पालखी प्रदक्षिणा व छबिना, भजन मंडळांचे भजन, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.
उत्सवकाळात मंदिरात कीर्तनकार ह.भ.प.अमृता नवाथे,जावडे, लांजा यांचे कीर्तन, दीपोत्सव,श्री. नाटेकर, पुणे यांचे वास्तूशास्त्र मार्गदर्शन, श्री विश्वकर्मा भजन मंडळ, आंबव सुतारवाडी, बुवा नंदकुमार पांचाळ यांचे भजन, स्वरनिहाली अभंग व नाट्यसंगीत कार्यक्रम सादरकर्ते निहाली गद्रेठाकूर, गोवा, कीर्तनकार ह.भ.प. विश्वनाथबुवा भाटे, उमरे रत्नागिरी, यांचे लळीताचे कीर्तन,श्री लक्ष्मीपल्लीनाथ नाट्यमंडळ, पालीनिर्मित अनिल काकडे लिखित दोन अंकी नाटक फायनल डिसीजन या नाटकाचा प्रयोग संपन्न झाला.
उत्सवात देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई, मानकरी गुरुराज सावंत, अनंत पालकर, प्रदीप घडशी, बबन काजरेकर, सुभाष गराटे, चंद्रकांत गुडेकर, विष्णू माईण, रोहित पांचाळ, अनिल धाडवे, गुरुदास धाडवे व पाली-पाथरटमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व भक्तांनी ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथ व श्री करंबेळदेव या मंदिरांच्या जीर्णोध्दाराचा १५ वा वर्धापनदिन कार्यक्रम अनुक्रमे दि.३० एप्रिल व १ मे रोजी पाली येथे पार पडणार आहे. यासह सर्व वार्षिक धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानचे मुख्य मानकरी व अध्यक्ष संतोष नारायण सावंतदेसाई यांनी केले आहे.
फोटो – पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानच्या वार्षिक चैत्रोत्सवाची सेवा करणार्या सतीश नवाथे कुटुंबीयांचा सत्कार करताना देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई व सोबत देवस्थानचे मानकरी.

