(जैतापूर / वार्ताहर)
जैतापूर परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दीड महिन्यापासून केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. सुमारे २० ते २५ किलोमीटर कार्यक्षेत्र असलेल्या या आरोग्य केंद्राअंतर्गत अनेक उपकेंद्रे आणि दुर्गम गावे येत असून, या भागासाठी अतिरिक्त वैद्यकीय मनुष्यबळाची गरज व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी बॉण्डवर कार्यरत असलेले एक वैद्यकीय अधिकारी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर येथून बदली होऊन गेले. मात्र, रिक्त झालेल्या त्या पदावर अद्याप नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, संपूर्ण आरोग्य केंद्राची जबाबदारी सध्या एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर पडली आहे.
सध्या कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी प्रशासकीय कामकाज, नियमित रुग्णसेवा, लसीकरण मोहिमा, विविध उपकेंद्रांच्या भेटी तसेच आपत्कालीन परिस्थितीत रात्रंदिवस सेवा देत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे आरोग्य सेवा सुरू असली तरी एकाच डॉक्टरांवर वाढलेला अतिरिक्त ताण भविष्यात रुग्णसेवेवर परिणाम करू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार असून ग्रामीण भागात ताप, सर्दी, डेंग्यू, मलेरिया आणि साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दोन वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी कार्यरत असणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
या आरोग्य केंद्राअंतर्गत डोंगर, साखर, पडवे, अनसुरे आणि जाणसी आदी उपकेंद्रांचा समावेश आहे. काही उपकेंद्रांमधील कर्मचारी पदेही रिक्त असल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसमोरील अडचणी अधिक गंभीर बनल्या आहेत.
स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास ही बाब आली नसल्याचा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली टुकरुल यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागी तातडीने नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असून लवकरच डॉक्टर उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही बाब आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आली असून प्रशासनाने तात्काळ रिक्त पदाची भरती करून जैतापूर परिसरातील नागरिकांना सक्षम आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
एकमेव वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्यामुळे त्यांच्यावर मोठा कामाचा ताण पडत असून त्याचा परिणाम आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर होऊ नये यासाठी दुसरे रिक्त पद तातडीने भरावे, अशी जोरदार मागणी आता परिसरातून होत आहे.

