(रत्नागिरी)
तालुक्यातील पाली बाजारपेठेच्या परिसरात व्यवसाय करण्यासाठी शासकीय कोट्यातून जागा मिळावी, यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेल्या अपंग नागरिक राकेश भानू कांबळे यांनी अखेर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे येत्या १६ जूनपासून कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची पूर्वसूचना दिली आहे.
कांबळे हे कशेळी येथील रहिवासी असून त्यांचे अपंगत्व ७५ टक्के आहे. वय ४१ असलेल्या या नागरिकाने स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी पाली बाजारपेठेच्या दरम्यान व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त करत शासकीय कोट्यातून २०० चौ.फुट जागा मिळावी, अशी मागणी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे केली आहे. मात्र, सर्वे नंबर ३५ व ६५ या शासकीय भूखंडांमध्ये जागा उपलब्ध असतानाही अद्याप त्यांना कोणतीही सकारात्मक कारवाई झाली नसल्याचे त्यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“माझ्यावर संपूर्ण कुटुंबाचा भार असून, माझी व्यावसाय करण्याची तयारी असूनही प्रशासनाकडून योग्य तो निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या खचून गेलो असून, आता आमरण उपोषणाशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही,” असे कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे सूचित केले आहे की, जर योग्य ती कारवाई न झाल्यास १६ जून रोजी ते स्वतःसह कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील. या प्रकारामुळे अपंग नागरिकांच्या हक्काच्या जागांबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह या गंभीर इशाऱ्याकडे कोणत्या प्रकारे गांभीर्याने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.