(रत्नागिरी / वार्ताहर)
“विश्वासार्हता आणि लोकसंपर्क गमावलेल्या नेत्यांना सोबत घेऊन शतप्रतिशतची स्वप्ने पाहणाऱ्या सर्वात मोठ्या पक्षाला २०२९ मध्ये ‘ठाकरे ब्रँड’ काय असतो, हे आम्ही नक्की दाखवून देऊ,” असा इशारा मनसेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री. रुपेश जाधव यांनी दिला आहे.
बाळ माने यांनी घेतलेल्या निवडणुकीतील माघारीच्या निर्णयावर टीका करताना श्री. जाधव म्हणाले की, “ही धक्कादायक माघार चीड आणि उद्विग्नता निर्माण करणारी आहे. आमच्यासारख्या ठाकरे समर्थकांच्या ती जिव्हारी लागली आहे. रत्नागिरीची सुजाण जनता त्यांना कायमचे घरी बसवेल. इतकेच नव्हे, तर या निर्णयामुळे बाळ मानेंची राजकीय विश्वासार्हताच संपुष्टात आली आहे.”
पुढे बोलताना त्यांनी, “केवळ वैयक्तिक स्वार्थ आणि संधिसाधूपणातून उचललेले हे पाऊल भविष्यात त्यांच्यासाठी घातक ठरेल. येणाऱ्या काळात ‘ना घर का, ना घाट का’ अशी त्यांची अवस्था होईल, यात शंका नाही,” अशी जळजळीत टीकाही केली.

