(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नदुर्ग किल्ल्यावरील पानभुयार स्पॉटजवळ २५ वर्षीय तरुणीने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणीच्या प्रियकराविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणीचे नाव सुखप्रीत धाडीवाल (रा. पिंपळगाव, नाशिक; मूळ रा. एलनाबाद, जि. सिरसा, हरियाणा) असे आहे. तर तिच्या प्रियकराविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयिताचे नाव जस्मिक केहर सिंग (वय २९, सिध्दीविनायक नगर, शिवाजीनगर, रत्नागिरी; मूळ रा. भाटिया कॉलनी, फतेहाबाद, हरियाणा) असे आहे.
सुखप्रीत ही काही दिवसांपूर्वी नाशिकहून बेपत्ता झाली होती. तिचे वडील प्रकाशसिंग धाडियाल यांनी पिंपळगाव पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली होती. तपासादरम्यान सुखप्रीत रत्नागिरी येथे आल्याचे समजताच ते गुरुवारी रत्नागिरीला दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेली चप्पल आणि ओढणी दाखवताच त्यांनी ती आपल्या मुलीची असल्याची ओळख पटवली.
तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, सुखप्रीत आणि जस्मिक यांच्यात मैत्रीचे संबंध होते. मात्र जस्मिकने नंतर तिच्याशी नातं तोडून दुसऱ्या मुलीसोबत संबंध प्रस्थापित केले आणि वेळोवेळी तिचा मानसिक छळ केला. त्यामुळे रत्नागिरी येथे येऊन त्याने तिला भेटण्यास नकार दिला आणि तिला परत जाण्यास सांगितले. याच मानसिक दबावामुळे सुखप्रीतने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत. दरम्यान, सुखप्रीतचे वडील आणि भाऊ शुक्रवारी मूळगावी रवाना झाले असून, पोलिसांकडून समुद्रकिनाऱ्यावर गस्त आणि ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू आहे. तरुणीचा मृतदेह सापडताच तिच्या कुटुंबीयांशी संपर्क केला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

