(रत्नागिरी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. हे शिबिर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले.
झाडगाव येथील मत्स्यालय व मत्स्य संग्रहालय वर्षभर सुरू असून दरवर्षी दोन लाखांहून अधिक पर्यटक आणि शालेय विद्यार्थी येथे भेट देतात. त्यामुळे केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. “कर्मचाऱ्यांचे आरोग्य हीच संस्थेची खरी संपत्ती आहे,” असे प्रतिपादन केंद्राचे प्रमुख डॉ. केतन चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. शेखर कोवळे यांनी शिबिरामागील उद्देश स्पष्ट करताना सुलभ, किफायतशीर आणि दर्जेदार आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा हेतू असल्याचे सांगितले. हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपचारपद्धती, यंत्रणा तसेच २४ तास कॅज्युअल्टी व ओपीडी सेवांची माहिती त्यांनी दिली. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व आणि जीवनशैलीजन्य आजारांपासून बचावासाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.
यावेळी डॉ. आर्या माने यांनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध तज्ज्ञ डॉक्टर आणि सेवांची माहिती दिली. जनरल सर्जरी, अस्थिरोग व न्युरोसर्जरी, कॅन्सर शस्त्रक्रिया, डायलिसिस (पूर्णपणे मोफत), डोळ्यांची तपासणी तसेच २४x७ ओपीडी-आयपीडी सुविधा येथे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिराचे उद्घाटन डॉ. केतन चौधरी यांचे ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ तयार करून करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने कर्मचाऱ्यांची रक्तदाब, रक्तातील साखर आणि सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली. नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना हेल्थ कार्ड वितरित करण्यात आले. या कार्डद्वारे संबंधित रुग्णालयात तपासण्या, सल्लामसलत, औषधे व उपचारांवर विशेष सवलती मिळणार आहेत. उपक्रमाला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. समिधा गोरे तसेच वैद्यकीय व प्रशासकीय टीमचे आभार मानण्यात आले. भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी असे उपक्रम राबवले जाणार असल्याचे केंद्राच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
या उपक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

