(रत्नागिरी / प्रतिनिधी)
लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून ३७ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रत्नागिरी शहरातील नाचणे परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राहुल नंदकिशोर मुळे (वय ३७, रा. एकता वसाहत, शांतीनगर-नाचणे, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी (१६ मे) रात्री ही घटना उघडकीस आली. राहुलचे वडील नंदकिशोर मुळे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, राहुल याला मायग्रेनचा त्रास होता. प्रकृतीच्या समस्येमुळे त्याचे लग्न जमत नसल्याने तो दीर्घकाळ मानसिक नैराश्यात वावरत होता. शनिवारी सायंकाळी राहुल घरीच होता. दरम्यान, त्याचे आई-वडील हॉस्पिटलमध्ये ब्रेन स्क्रिनिंग तपासणीसंदर्भात चौकशी करण्यासाठी बाहेर गेले होते.
सायंकाळी घरी परतल्यानंतर मुख्य दरवाजाला कुलूप असल्याचे दिसून आले. दुसऱ्या चावीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता राहुलने घरात नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. हा प्रकार पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

