(नाणीज)
रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्या सात पिठांमधून निसर्ग वाचवण्याचे आवाहन करीत ‘वसुंधरा’ पायी दिंड्यांचे आयोजन केले आहे. या दिंड्याद्वारे वाटेत ठिकठिकाणांनी ५ हजार झाडे लावली जाणार आहेत.
नागपूर, नाशिक, तेलंगणा, परभणी, पुणे, मुंबई, गोवा येथील उपपिठावरून या दिंड्या निघणार आहेत. दिंड्यात हजारो भाविक सहभागी होत आहेत. त्यांचा एकूण प्रवास हजारो किलोमीटरचा आहे. वाटेत गावोगावी ते ‘ग्लोबल वॉर्मिग’ बाबत लोकांत जागृती करणार आहेत. या दिंडीमध्ये रामानंदाचार्य पिठाच्या युवासेनेमार्फत गावोगावी पथनाट्य करून निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून देत देत या दिंड्या मजल दरमजल करत नाणिजधाम कडे येत आहेत.तसेच या पायी दिंड्यांमध्ये समाजातील प्रतीत यश व्यक्तींच्या शुभहस्ते वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यातील नागपूरची दिंडी नाणीजकडे मार्गस्थ झाली आहे. सर्व दिंड्या २१ ऑक्टोबरला रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या वाढदिवसदिनी श्री क्षेत्री दाखल होतील.
सध्या वातावरणामध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत, होत आहेत. त्याचा परिणाम अखिल प्राणीमात्रांवर होत आहे. यालाच आपण ‘ग्लोबल वॉर्मिग’ असे म्हणतो. माणसाने निसर्गावर जे अत्याचार केले आहेत, त्यामुळे वेळीअवेळी पाऊस पडणे, प्रचंड उष्णतामान वाढणे, जमिनी निकृष्ठ दर्जाच्या होणे असे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. ते थांवण्यासाठी समाजजागृती रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून पायी दिंड्यांच्या माध्यमातून व्यापक जनजागरण मोहीम हाती घेतली आहे. यंदाही ती आणखी व्यापक प्रमाणात राबवली जात आहे. त्यातून समाजजागृती करून वृक्षांचे व वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देणे, पाण्याचे महत्व वाढवणे, प्लास्टिक वापर टाळून निसर्गाला हानी पोहोचवनाऱ्या वस्तूंचा वापर टाळणे, याबाबत जनजागरण केले जाणार आहे. दिंडीतील भाविकांच्या हातात प्रबोध करणारे प्रचार फलक आहेत. त्यांच्या कपड्यांवरही स्लोगन लिहिल्या आहेत.
सर्वप्रथम नागपूरची दिंडी १२ सप्टेंबर २०२५ला निघाली आहे. मराठवाडा पीठ क्षेत्र परभणी येथून दिंडी २८ सप्टेंबरला निघणार आहे. तेलंगणा पीठ क्षेत्र कामारेड्डी येथून २७ सप्टेंबरला निघणार आहे. उत्तर महाराष्ट्र क्षेत्र नाशिक येथून २९ सप्टेंबरला दिंडी निघेल. मुंबई पीठ क्षेत्र वसई येथून ४ ऑक्टोबरला, गोव्यातून १० ऑक्टोबरला दिंडी निघेल. पश्चिम महाराष्ट्र पुणे येथून ६ ऑक्टोबरला दिंडी निघणार आहेत, एकूण सात दिंड्या निघणार आहेत, तर या सर्व दिंड्या २१ ऑक्टोबर रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वाढिवसदिनी नाणीज क्षेत्री येतील.
दिंडीतील सर्व भाविकांना ‘यात्रिक’ संबोधले आहे. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये फिरती शौचालये, स्नानाची सुविधा, निवासाची सोय, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, दोन वेळचा महाप्रसाद, नाष्टा आदींचा समावेश आहे. समाजप्रबोधन हा या दिंड्यांचा मुख्य उद्देश आहे. संस्थानतर्फे अनेक वर्षे समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत.

