(नवी दिल्ली)
नैऋत्य मान्सून अखेर केरळमध्ये अधिकृतपणे दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (गुरुवारी) केली. गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू असला तरी आता मान्सूनच्या आगमनावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यंदा मान्सूनच्या आगमनाला नेहमीपेक्षा चार दिवसांचा विलंब झाला आहे.
हवामान विभागाने यापूर्वी मान्सून २६ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र हवामानातील बदलांमुळे मान्सूनचा वेग मंदावला आणि तो अखेर केरळ किनारपट्टीवर पोहोचला. साधारणपणे १ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होतो.
दरम्यान, केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तिरुवनंतपुरम, कोल्लम, पत्तनमथिट्टा, इडुक्की आणि त्रिशूर भागातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
केरळसह तामिळनाडू आणि कर्नाटकातील अनेक भागांमध्ये पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, तेलंगणा यांसह देशातील २४ राज्यांमध्ये पाऊस आणि वेगवान वाऱ्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दुसरीकडे, गुजरात, पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम असून काही भागात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले जात आहे. मात्र महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी म्हणजे पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ६ ते ७ जूनदरम्यान मान्सून तळकोकणात पोहोचेल. त्यानंतर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील इतर भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतातील उष्णतेने त्रस्त नागरिकांनाही मान्सूनमुळे दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, ३० जूनपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीमध्ये २५ ते ३० जूनदरम्यान मान्सून पोहोचू शकतो, तर उत्तर प्रदेशात १५ जूनच्या आसपास मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

