(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल ग्रामपंचायत कार्यालयात पत्नीला मदत करण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्यात आल्याची आणि त्यांच्यासह पत्नीला उद्देशून अपमानास्पद व जातिवाचक वक्तव्य केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी पांडूरंग हिरू जाधव (वय ६०, रा. ओशीवळे बौद्धवाडी, ता. राजापूर) यांनी मोहन नारकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पांडूरंग जाधव यांच्या पत्नी वंदना जाधव या मागील १२ वर्षांपासून पाचल ग्रामपंचायतीत कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ग्रामपंचायत कार्यालय व सभागृहाची स्वच्छता, कार्यक्रमावेळी खुर्च्या-टेबल लावणे आदी कामांमध्ये पांडूरंग जाधव हे त्यांच्या पत्नीला मदत करत असतात.
बुधवारी सकाळी ते पत्नीसमवेत ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. प्रकृती अस्वस्थ असल्याने व किडनी व हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे ते कार्यालयातील एका खुर्चीवर बसून दुसऱ्या खुर्चीवर पाय ठेवून आराम करत होते. त्यावेळी मोहन नारकर यांनी तेथे येऊन “तू खुर्चीवर पाय ठेवून का बसलास?” असा जाब विचारत त्यांच्याशी वाद घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी पांडूरंग जाधव यांनी प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले असता, संतप्त झालेल्या मोहन नारकर यांनी त्यांच्या कानशिलात मारून खुर्चीतून ओढल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच “मी कोण आहे तुला माहिती आहे का? ही ग्रामपंचायत कोणाची आहे माहिती आहे का?” असे दमदाटीचे वक्तव्य केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पत्नी वंदना जाधव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही “तुम्ही कोण आहात हे मला माहिती आहे… तुमच्या लोकांची हीच अवस्था आहे” असे म्हणत अपमानास्पद व जातिवाचक वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर ग्रामपंचायतीचे सरपंच बाबालाल फरास तसेच माजी सरपंच अपेक्षा मासये घटनास्थळी आले. सरपंचांनी मारहाण करणे चुकीचे असल्याचे सांगितल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर वंदना जाधव यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयांच्या चाव्या सरपंचांकडे सुपूर्द केल्या व पतीसमवेत तेथून निघून गेल्या.
या घटनेनंतर पांडूरंग जाधव यांनी मोहन नारकर यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत चौकशीसाठी राजापूर-लांजा पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश कदम, त्यांचे सहकारी अधिकारी तसेच रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे ठाणे अंमलदार कमलाकर पाटील व पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे आज उपस्थित होते. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, यामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच आठवडाभरात या प्रकरणाचा तपास पूर्ण होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

