(रत्नागिरी)
मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमातील कलम ४(२) मधील दुरुस्तीची प्रभावी अंमलबजावणी करून बेदखल कुळांना न्याय मिळावा, अशी मागणी बहुजन विकास आघाडीतर्फे लांजा तहसीलदार श्रीमती प्रियांका ढोले यांच्याकडे करण्यात आली. यावेळी बविआचे नेते सुरेश भायजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांशी सविस्तर चर्चा केली.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेदखल कुळांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी बहुजन विकास आघाडीने गेली अनेक वर्षे सातत्याने संघर्ष केला आहे. गोरगरीब आणि कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी विविध आंदोलने व पाठपुरावा करण्यात आला. सन २००२ आणि २००६ मध्ये कुळ कायद्यातील कलम ४(२) मध्ये दुरुस्ती करण्यात आली असली, तरी अनेक प्रकरणांमध्ये संबंधितांना अद्याप न्याय मिळत नसल्याची तक्रार कुळांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीतर्फे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बविआच्या पूर्वीच्या आंदोलनानंतर कलम ४(२) मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार, एखादी व्यक्ती सातत्याने जमीन कसत असल्याचे परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध असतील आणि गावचे सरपंच, पोलिस पाटील, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष तसेच शेजारील जमिनीचा लागवडदार यांनी शपथपत्राद्वारे त्या व्यक्तीचा जमिनीवरील कब्जा आणि किमान १२ वर्षांपासून अखंडित शेती करत असल्याचे प्रमाणित केल्यास, त्या व्यक्तीस कुळ म्हणून मान्यता देण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. या दुरुस्तीची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र कुळांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी बविआ नेते सुरेश भायजे, चंद्रकांत परवडी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अॅड. स्मिता मांडवकर, तालुकाध्यक्ष दिलीप चौगले, नंदकुमार आंबेकर, संभाजी काजरेकर आदींनी तहसीलदारांसमोर बेदखल कुळांच्या प्रश्नांचे गांभीर्य मांडले.
निवेदन देण्यासाठी प्रकाश मांडवकर, विलास दरडे, वसंत घडशी, संजय गोंधळी, आत्माराम करंबेळे, सुभाष मसणे, यशवंत घडशी, सुरेश गावडे, शांताराम गाडे, अजय नेमन, जयवंत खुलम, दीपक निवाते, काशिनाथ पोसकर, प्रभाकर सनगरे, रघुनाथ भितळे, संतोष चांदे, वसंत देवळेकर, मंगेश मोरे, हर्षद तरळ, संदीप घडशी यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

