(मुंबई)
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या निषेधार्थ रविवारी मविआने एकजूट दाखवित रस्त्यावर उतरून मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे विशेष भगव्या रंगाचा कुर्ता घालून आले होते. शरद पवारही प्रचंड उत्साह दाखवित शाहू महाराज छत्रपती यांचा हात हातात घेऊन मोर्चात चालले. आजारपणामुळे गेली काही दशके ते मोर्चात चालले नाहीत. पण रविवारी महायुतीसह मोदी सरकार पाडायचेच ही इर्षा दाखवत त्यांनी दमदार पावले टाकली. यावेळी महायुतीवर ताशेरे ओढणारे फलक लक्ष वेधून घेत होते. कार्यकर्त्यांनी लक्षवेधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस पक्ष मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज रस्त्यावर उतरले. या आंदोलनात अनेक शिवप्रेमी आणि आघाडीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. आधी हुतात्मा चौक ते गेट-वे ऑफ इंडिया असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवद्रोह्यांना माफी नसल्याची घणाघाती टीका केली. शरद पवार यांनी पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्यानेच पुतळा कोसळल्याची टीका केली. तर खासदार शाहू महाराज यांनी या घटनेनंतर महाराष्ट्र, देश आणि देशाबाहेर संताप होत असल्याची टीका केली.
राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन म्हणून हुतात्मा चौक येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात छत्रपती शाहू महाराज, संजय राऊत, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत, भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे, अस्लम शेख, वैभव नाईक हे आघाडीतील नेते सहभागी झाले होते.