(तेहरान)
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाने आता गंभीर वळण घेतले असून जागतिक ऊर्जा सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील असलुयेह शहरातील साउथ पार्स गॅस क्षेत्रावर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि कुवेतमधील तेल व गॅस प्रकल्पांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमुळे अनेक ठिकाणी भीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे.
विशेषतः कतारमधील रास लफान गॅस प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या एलएनजी हबपैकी एक मानला जातो आणि जागतिक गॅस पुरवठ्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. या हल्ल्यामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होऊ शकतो.
कतारचा नॉर्थ डोम आणि इराणचा साउथ पार्स हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायू साठा मानला जातो. या दोन्ही क्षेत्रांवर हल्ले झाल्याने ऊर्जा स्रोत थेट युद्धाच्या कक्षेत आले आहेत. त्यामुळे हा संघर्ष अधिक धोकादायक टप्प्यात पोहोचल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
भारतासाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरू शकते. कारण भारत आपल्या एलएनजी गरजेपैकी सुमारे 38 ते 40 टक्के गॅस कतारमधून आयात करतो. विशेषतः रास लफान येथून होणारा पुरवठा महत्त्वाचा असल्याने या प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणने नागरिक आणि महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करून रेड लाईन ओलांडल्याचा आरोप केला आहे. अशा हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशातील तणाव आणखी वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. दुसरीकडे, अमेरिका आणि इस्रायलनेही इराणला कठोर इशारा दिला असून परिस्थिती आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
या संघर्षाचा थेट परिणाम जागतिक तेल बाजारावर होत असून कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती आणखी बिघडल्यास तेलाचे दर 200 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात. याशिवाय होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे तेल वाहतुकीवरही परिणाम होण्याची भीती आहे.
सध्या सुरू असलेले हे युद्ध तीन आठवड्यांहून अधिक काळ चालू असून लवकर थांबण्याची शक्यता कमी आहे. ऊर्जा क्षेत्रावर होणारे सततचे हल्ले पाहता, जगभरात ऊर्जासंकट आणि महागाई वाढण्याची शक्यता अधिक बळावत आहे.

