( मुंबई )
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर कठोर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली.
संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.”
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद निवडणुकीत बाळ माने यांनी ऐनवेळी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जात उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीची मोठी राजकीय कोंडी आणि नाचक्की झाली. या घडामोडीनंतर शिवसेना ठाकरे गटाने कठोर भूमिका घेत पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा ठपका ठेवत बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची अधिकृत माहिती खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत अपेक्षित होती. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अनिकेत तटकरे मैदानात होते, तर ठाकरे गटाने बाळ माने यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बाळ माने यांनी थेट भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
“घोडेबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली”
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक गौप्यस्फोट केले. त्यांनी सांगितले की, या मतदारसंघात एकूण 1018 मतदार असून महाविकास आघाडीचे संख्याबळ सुमारे 200 मतांचे होते. निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत असतानाच काही मतदार तीर्थयात्रेला गेल्याचे समोर आले. तसेच आवश्यक सह्यांसाठी वारंवार विनंती करूनही महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही.
“माझ्या कानावर घोडेबाजार सुरू असल्याची माहिती आली. कोकणाच्या राजकीय संस्कृतीला हे योग्य नाही. त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला,” असे बाळ माने म्हणाले.
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांचे मानले आभार
बाळ माने यांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आणि सन्मान दिल्याचे सांगितले. विधानसभेतील जागावाटपात संधी न मिळाल्यानंतर ठाकरे गटानेच आपल्याला उमेदवारी दिली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, महायुतीतील संभाव्य मतविभाजनाचा फायदा होईल, असा अंदाज होता. मात्र, जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर समीकरणे बदलल्याचे त्यांनी नमूद केले.
राणेंसोबत घरवापसी होणार?
नारायण राणे यांच्या सांगण्यावरून पुन्हा घरवापसी करणार का? असा प्रश्न विचारला असता बाळ माने म्हणाले, “राजकारणात जर-तरला काही अर्थ नसतो. मी बार्गेनिंग केले असते तर खूप काही कमावले असते.” दरम्यान, बाळ माने यांच्या माघारीनंतर कोकणातील विधानपरिषद निवडणुकीतील रंगत संपुष्टात आली असून महायुतीला मोठा राजकीय फायदा झाल्याची चर्चा सुरू आहे.

